बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थिनीचा टेरेसवरून पडून मृत्यू…!

0
13

बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थिनीचा टेरेसवरून पडून मृत्यू…!

बारामती, दि. ४ सप्टेंबर २०२६ : भिगवण रोड परिसरातील निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीने उडी घेतल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. गंभीर जखमी अवस्थेत तिला वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे ५ वाजता तिचा मृत्यू झाला.
पालकांच्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनीवर अभ्यास व परीक्षेचा ताण होता. रात्री साडेबारा वाजेपर्यंत अभ्यास केल्यानंतर ती टेरेसवर गेली होती. वडील तिला पाहण्यासाठी गेले असता ती टेरेसच्या कड्यावर बसलेली दिसली आणि त्यानंतर तिने खाली उडी घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, बारामती शहर पोलिसांकडून घटनास्थळ, सीसीटीव्ही, वैद्यकीय कागदपत्रे, डिजिटल माहिती तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी, सहाध्यायी व शिक्षकांचे जबाब घेऊन सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीची ओळख पोलिसांनी गोपनीय ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here