सराईत गुन्हेगारांना दणका! बारामतीत गंभीर गुन्ह्यांत मोठी घट

0
7

सराईत गुन्हेगारांना दणका! बारामतीत गंभीर गुन्ह्यांत मोठी घट

बारामती : बारामती शहर, बारामती तालुका आणि माळेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांच्या प्रतिबंधक व तपासात्मक कारवाईला यश आले असून, गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे.
जुलै २०२५ अखेर तीनही पोलीस ठाण्यांत निवडक १० गंभीर गुन्ह्यांचे १७० गुन्हे दाखल होते. जुलै २०२६ अखेर ही संख्या १५९ वर आली असून, तब्बल ११ गुन्ह्यांची म्हणजेच ६.५ टक्के घट झाली आहे.
विशेष म्हणजे खुनाचे गुन्हे २ वरून थेट शून्यावर आले आहेत. खून व खुनाचा प्रयत्न मिळून गुन्हे १३ वरून १० झाले आहेत. तसेच बलात्कार १६ वरून १३, जबरी चोरी १४ वरून ८ आणि चैन स्नॅचिंगचे गुन्हे १० वरून ७ झाले आहेत.
सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून नियमित गस्त, नाकाबंदी, रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी, तडीपार आरोपींची तपासणी, प्रतिबंधक बंधपत्राची कारवाई तसेच बंधपत्राचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. पात्र प्रकरणांमध्ये महाराष्ट्र धोकादायक कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसारही कारवाई केली जात आहे.
बारामती शहर व माळेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाली असली तरी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि चैन स्नॅचिंगमध्ये घट नोंदविण्यात आली आहे.
“गुन्हेगारांवर कायद्याचा वचक आणि नागरिकांच्या मनात सुरक्षेचा विश्वास” या उद्देशाने बारामती विभाग पोलीस यंत्रणा दिवस-रात्र कार्यरत असून, गुन्हेगारीला आणखी आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here