हसवत हसवत जीवनाची शिकवण; दुसऱ्याच्या आनंदातच खरा आनंद : जयवंत आवटे
‘प्रतिबिंब’ व्याख्यानमालेत हास्य, टाळ्यांचा कडकडाट आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन
बारामती, दि. ८ : “आपल्याला खरा आनंद आणि समाधान हवे असेल, तर दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधला पाहिजे. दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची संवेदनशीलता आपल्यात असली पाहिजे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते श्री. जयवंत आनंदा आवटे यांनी केले.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री व एन्व्हायरमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित,
एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (NGO), बारामती यांच्या वतीने आयोजित ‘प्रतिबिंब’ व्याख्यानमालेअंतर्गत ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या विषयावर आवटे यांचे व्याख्यान गदिमा सभागृह, विद्यानगरी, बारामती येथे झाले. यावेळी महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आवटे यांच्या मिश्कील शैलीतील किस्से, विनोद आणि जीवनाविषयीच्या विचारांनी सभागृहात हास्याचा कल्लोळ आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सतत स्पर्धा, तुलना आणि ईर्षेच्या मागे धावत आहे. “आपल्या मुलाला किती गुण मिळाले, यापेक्षा दुसऱ्याच्या मुलाला किती गुण मिळाले, याची चिंता आपल्याला अधिक असते,” असे सांगत आवटे यांनी बदलत्या मानसिकतेवर मिश्कील भाष्य केले. सततची तुलना आणि ईर्ष्या माणसाच्या आनंदावर परिणाम करते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील छोट्या-छोट्या आनंदांचा मनापासून अनुभव घेतला पाहिजे आणि इतरांच्या आनंदात सहभागी झाले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.
समाजातील बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करताना त्यांनी शिक्षण, मुलांचे संगोपन, वाढत्या आर्थिक अपेक्षा, कर्जबाजारीपणा आणि शहराकडे वाढणारा ओढा यावरही आपल्या खास विनोदी शैलीत भाष्य केले. त्यांच्या प्रत्येक किस्स्यातून उपस्थितांना हसता हसता आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली.
“श्रीमंती वाढली म्हणून आनंद आपोआप वाढत नाही; जगण्याचा आनंद घेण्यासाठी एकमेकांशी संवाद आणि संवेदनशीलता आवश्यक आहे,” असे आवटे यांनी स्पष्ट केले.
निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेच्या कार्याचेही कौतुक केले. निसर्गाचे संवर्धन करण्याबरोबरच माणसाला सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणे हीदेखील महत्त्वाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अनुभवातून जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी स्पष्ट करताना आवटे यांनी ‘ब्रह्मकमळ’ या फुलाचे उदाहरण दिले. त्याच्या सौंदर्याचे काव्यात्मक वर्णन करत त्यांनी निसर्गातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही किती मोठा आनंद आणि अर्थ दडलेला असतो, हे उपस्थितांना जाणवून दिले.
“जीवन समृद्ध करायचे असेल तर अशा कार्यक्रमांना गेले पाहिजे, एकमेकांशी संवाद साधला पाहिजे आणि पुढे जाताना दुसऱ्यालाही आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान आवटे यांच्या विनोदी, मिश्कील आणि ओघवत्या शैलीला उपस्थितांनी मनमुराद दाद दिली. त्यांच्या वक्तृत्वातून हास्य, विचार आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. हसवता हसवता जीवनाचा गंभीर अर्थ समजावून सांगणारे हे व्याख्यान उपस्थितांच्या चांगलेच स्मरणात राहिल.

