बारामतीत रस्त्यालगतच्या फ्लेक्स-बॅनरना मुभा का?
संबंधितांना नागरिकांकडून प्रश्न..!
बारामती : शहरासह एमआयडीसी परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि चौकाचौकांत मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स, पोस्टर व बॅनर लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असून किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक चौकांमध्ये उभारण्यात आलेले मोठे फ्लेक्स वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे वाहन चालविताना क्षणभर दुर्लक्ष होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, फ्लेक्सकडे लक्ष गेल्याने एका वाहनचालकाचा अपघात थोडक्यात टळल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
शहरातील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारचे फ्लेक्स व बॅनर नियमांनुसार लावले जात आहेत का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच बारामती नगरपरिषद आणि एमआयडीसी प्रशासनाने या अनधिकृत किंवा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फ्लेक्सवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“रस्त्यालगत आणि चौकांमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्स-बॅनरना मुभा का?” असा सवाल आता सर्वसामान्य व सुज्ञ बारामतीकरांकडून उपस्थित केला जात आहे.



