आठवणींना उजाळा देऊयात…
भावनगरीच्या वतीने स्व .अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली!
“दादा… तुमच्या प्रतिमेकडे पाहत पाहत आज पाच महिने उलटले…”
आज आपल्या सर्वांच्या लाडक्या दादांना आपल्यातून जाऊन पाच महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकत आहे, पण तुमच्या आठवणी आजही प्रत्येक बारामतीकराच्या हृदयात जिवंत आहेत. तुमची उणीव केवळ बारामतीलाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला प्रत्येक क्षणी जाणवत आहे.
दादा, तुम्ही केवळ एक राजकीय नेता नव्हता; तुम्ही विकासाचे शिल्पकार, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि जनतेच्या हितासाठी अखंड झटणारे लोकनेते होता. बारामतीचा विकास करताना तुम्ही महाराष्ट्राला नियोजन, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख प्रशासनाची नवी दिशा दिली. तुमच्या कार्यामुळे बारामतीची ओळख देशातच नव्हे तर परदेशातही अभिमानाने घेतली जाऊ लागली.
महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रीपदावर आपल्या कामाचा ठसा उमटवणारे, सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय अजितदादा. जिथे जाल तिथे आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, जनतेच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणारे हे नेतृत्व आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे.
आज महाराष्ट्रात अनेक बदल घडत आहेत. अशा वेळी तुमच्यासारखा निर्णयक्षम, विकासाभिमुख आणि जनतेच्या हिताचा विचार करणारा नेता किती महत्त्वाचा असतो, याची जाणीव अधिक तीव्रतेने होत आहे. तुमची कार्यपद्धती, तुमची स्पष्ट भूमिका आणि विकासाची दूरदृष्टी आजही अनेकांना प्रेरणा देत आहे.
तुमच्या पावलावर पाऊल ठेवत श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार समाजसेवेचे कार्य पुढे नेत आहेत. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, शक्ती आणि यश देवो. त्यांच्या माध्यमातून बारामती, महाराष्ट्र आणि देशाची सेवा अधिक जोमाने घडो, हीच मनःपूर्वक सदिच्छा. बारामतीकरांची मायमाऊली म्हणून त्या दादांप्रमाणेच जनतेच्या सेवेत सदैव कार्यरत राहोत, हीच प्रार्थना.
“काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात; पण त्यांचे विचार, कार्य आणि माणुसकी कायम जिवंत राहते. अशाच अजरामर व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय अजितदादा.”
दादा, तुमच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
भावनगरी परिवाराकडून स्वर्गीय अजितदादा पवार यांना कोटी कोटी प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली!






