बारामतीत रेशीम उद्योग विकासाला नवी दिशा मैसूरहून आलेल्या तज्ज्ञ मान्यवरांनी घेतला बाजार समितीच्या अद्यावत कामकाजाचा आढावा…
मैसूरहून आलेल्या तज्ज्ञ मान्यवरांनी घेतला बाजार समितीच्या अद्यावत कामकाजाचा आढावा
बारामती : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या रेशीम उद्योगाच्या विकासासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेत विशेष मार्गदर्शन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मैसूर तसेच इतर भागांतून आलेल्या तज्ज्ञ मान्यवरांना बारामतीतील रेशीम उद्योगाचे अद्यावत कामकाज, शेतकऱ्यांचा सहभाग आणि उद्योगवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी डॉ. पी. दीपा डायरेक्टर सी एस आर टी आय, मैसूर केंद्रीय रेशीम मंडळ डॉ. रेवाप्पा एम आर शास्त्रज्ञ बी म्हैसूर, डॉ. सुनील राठोड, शास्त्रज्ञ बी अनुसंधान विस्तार केंद्र बारामती, बेंगलोर सौ. उपाध्ये मॅडम तसेच सौ. नीता डाग हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत रेशीम उद्योगाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव हौसेराव कोकरे, बारामती रेशीम उद्योगाचे मोहन गायकवाड, निरीक्षक सूर्यकांत मोरे, शेतकरी प्रतिनिधी विनोद गुळूमकर, विष्णू गुळूमकर, राजू इंगळे, कर्नाटकातील गुलबर्गा येथील नजीर तसेच बारामती मार्केटिंग विभागाचे सोमनाथ जगताप उपस्थित होते.
बैठकीदरम्यान बाजार समितीच्या वतीने रेशीम उद्योगाची सद्यस्थिती, व्यापार व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया आणि उद्योग विस्तारासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती सादर करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनीही आपली मते मांडत रेशीम उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र व्यापारपेठ उभारणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि रोजगारनिर्मिती करणारा व्यवसाय ठरू शकतो, असे सांगितले. योग्य नियोजन, प्रभावी बाजारपेठ आणि शासकीय सहकार्य मिळाल्यास बारामती परिसरात रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीमुळे बारामतीतील रेशीम उद्योगाला नवी दिशा मिळणार असून शेतकऱ्यांमध्येही नव्या संधींबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.





