१० महिन्यांनंतर पोलिसांची मोठी कामगिरी; कोयत्याने हल्ला करून लूट करणारा आरोपी अखेर जेरबंद
बारामती, दि. १६ — तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला करून लूटमार करणाऱ्या प्रकरणातील आरोपीला तब्बल १० महिन्यांनंतर बारामती तालुका पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत आरोपीकडून सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.
जून २०२५ मध्ये घडलेल्या या घटनेत, मार्केटयार्ड परिसरातील २२ वर्षीय तरुण आपल्या मैत्रिणीसोबत तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या मोकळ्या जागेत बसला होता. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी चेहऱ्यावर रूमाल बांधून त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
आरोपींनी मोबाईल व पैसे देण्याची मागणी केली. विरोध केल्यावर एका आरोपीने लोखंडी कोयत्याने तरुणाच्या पायावर वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने २,५०० रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मोटारसायकलची चावीही घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी फरार होता. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत अखेर अजय नंदकुमार सकट (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) याला १५ एप्रिल २०२६ रोजी अटक केली.
अटक केलेल्या आरोपीकडून सुमारे ४.९०० ग्रॅम वजनाची, अंदाजे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने करीत आहेत.





