बारामतीसाठी शिरसाई योजनेचे पंप दोन दिवसांत सुरू होणार; ‘जनाई’चे पाणी २२ एप्रिलनंतर

0
20

बारामतीसाठी शिरसाई योजनेचे पंप दोन दिवसांत सुरू होणार; ‘जनाई’चे पाणी २२ एप्रिलनंतर
कृष्णा खोरेमहामंडळाच्या अधिकाऱ्यांशी युगेंद्र पवार यांची सकारात्मक चर्चा
पुणे : बारामती तालुक्यासाठी शिरसाई योजनेचे पंप येत्या दोन दिवसात सुरू करू तसेच जनाई योजनेचे पाणी २२ एप्रिलनंतर सोडण्यात येईल, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळातर्फे देण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार यांनी दिली. याबरोबरच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची असलेल्या बंद पाईपलाइनच्या प्रश्नावर देखील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बारामती तालुक्यातील सिंचनाच्या विविध प्रश्नांबाबत युगेंद्र पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. प्रशांत सातव, कैलास पवार, पोपट पानसरे, विठ्ठल जराड, अमोल गवळी, शशांक पवार, भाऊसाहेब बागल आदी शेतकरी बांधव याप्रसंगी उपस्थित होते.

बारामती तालुक्यातील पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाविषयी सविस्तर चर्चा केली. यासोबतच पुरंदर उपसा सिंचन योजना, नीरा कऱ्हा नदी जोड प्रकल्प आणि लाभधारक शेतकरी बांधवांच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामांविषयीची सद्यस्थिती त्यांनी अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून दिली.

बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांतील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नीरा व कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे हे स्व.अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. या योजनेच्या माध्यमातून या भागातील गावांवरील जिरायत हा शिक्का कायमस्वरुपी पुसून टाकला जाणे शक्य आहे. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात नीरा कऱ्हा नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली असली तरी या योजेनेसाठी निधीची तरतूद केलेली दिसत नाही. त्यामुळे हा प्रकल्प कधी व कसा पूर्ण करणार, याबाबत कसलीही स्पष्टता नसल्याचे युगेंद्र पवार यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

हा प्रकल्प शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असून या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होणार आहे. या भागातील नागरीकांची होणारी सोय आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने भरीव तरतूद करावी; आणि हे काम मार्गी लावावे अशी मागणीही युगेंद्र पवार यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here