पाणी प्रश्नाबाबत थोपटेवाडी गावास सभापती किरण तावरे यांची भेट

0
8

पाणी प्रश्नाबाबत थोपटेवाडी गावास सभापती किरण तावरे यांची भेट

बारामती:
थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.
संविधानाने दिलेल्या अधिकारांचे पालन व्हावे, गावामध्ये एकोप्याचे सलोख्याचे वातावरण रहावे आणि सर्वांना समान न्याय दिला जावा तसेच गावच्या पाणी प्रश्नाचा विचार करून पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहीर आणि बोरवेलचे काम ग्रामपंचायतीने करावे आदी सूचना सभापती किरण तावरे यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना दिल्या व पाणी टंचाईचा विचार करून पंचायत समिती मार्फत देखील गावात बोरवेल मंजूर करून दिले जाईल तसेच जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा लाईनचे काम युद्ध पातळीवर होऊन शेवटच्या घटकापर्यंत पाणी मिळावी याकरिता आढावा बैठक घेण्यात येईल. तसेच या योजनेस निधी कमी पडत असेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून अधिकचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी तक्रारदार व उपस्थित नागरिकांनी पाणी व सेवा सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले व सभापती यांनी तातडीने भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त केले आणि आमचा पाणी प्रश्न सोडवा अशी मागणी केली.
यावेळी बारामती पंचायत सभापती किरण तावरे,पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार,
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे,थोपटेवाडी गावच्या सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ अजय पिसाळ,प्रमोद पानसरे, सुधीर यादव,शशिकांत पानसरे, वैशाली धोत्रे, मोहन वाल्हेक, ज्ञानदेव लष्कर लक्ष्मण चौगुले, जगन्नाथ पिसाळ आनंद लष्कर, सचिन कांबळे, करण साबळे, हरीष कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here