चाचा नेहरू बाल महोत्सवात आठशे बालकांचा सहभाग
पुणे, दि.१: अनाथ, निराधार व संकटात सापडलेल्या बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतील बालकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी २८ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम पुणे येथे आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सव २०२२-२०२३ मध्ये ८०० बालकांनी सहभाग घेतला.
यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, महिला व बाल विकास विभागीय उपआयुक्त सुहिता ओव्हाळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, महिला व बाल संरक्षण अधिकारी सुरेश टेळे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे आदि उपस्थितीत होते.
मैदानी खेळामध्ये कब्बडी व खोखो हे दोन सांघिक, लांब उडी व १०० मी धावणे हे दोन वैयक्तिक आणि इनडोअर खेळामध्ये बुद्धिबळ, कॅरम, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमात वैयक्तिक व सांघिक नृत्य स्पर्धा अशा सुमारे ११ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुले व मुलींच्या मोठा व लहान अशा दोन वयोगटात घेण्यात आल्या.
मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने विजयी बालकांना व संघांना मानचिन्हाने व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्था मुलींचे बालगृह, कर्वेनगर व मुलांचे ज्ञानदिप बालगृह दिघी यांनी सर्वात जास्त प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून विजेतेपदाचा चषक (चॅम्पियन ट्रॉफी) पटकावला.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात श्रीमती कांबळे यांनी कार्यक्रम आयोजनाबाबत माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी चित्रफीत संदेशाद्वारे बालकांना शुभेच्छा दिल्या.