सामसूम……
एखाद्या सराईताने
तंबाखू खाऊन पचकन थुकावं
किंवा
एखाद्या कुत्र्याने अचानक भुकावं,
एवढ्या सहजतेने
होतात इथे बलात्कार,
केल्या जातात आत्महत्या,
मारल्या जातात लेकी, सुना
फाडल्या जातात साड्या,
बनवल्या जातात शिड्या
… तरीसुद्धा सारं काही सामसूम……
भरदिवसा चो-या होतात,
माणसं कचाकच कापली जातात,
वखवखलेल्या नजरा
आयाबहिणींच्या अंगावरुन
बिनघोर फिरत राहतात,
“खुनी, बलात्कारी इथं
राजरोस सुटतात
अन्
त्यांच्याच स्वागताला इथं
फटाके फुटतात,,
….तरीसुद्धा सारं काही सामसूम……
लबाडांची फौज सोबतीला घेतली कीं
मोठं होता येतं,
जाती धर्माच्या पुड्या सोडून
खोटं गाणं गाता येतं,
….
कधीमधी मोर्चा निघतो,
कधीमधी निषेध होतो,
माणसं लढायला तयार होतात,
माणसंच माणसांचं गाणं गातात,
पण
गद्दारी उफाळून येते
अन्
लोकशाहीला लाचारीची हगवण लागते
मग होऊन जाते सामसूम……
…..सार काही सामसूम……
हनुमंत चांदगुडे
9130 552 551