Homeलेखकार्यमग्न, तत्वे जोपासणारे , ज्ञानसाधनेचा , मुक्तपणे वाटण्याचा वसा जपणारे ,...

कार्यमग्न, तत्वे जोपासणारे , ज्ञानसाधनेचा , मुक्तपणे वाटण्याचा वसा जपणारे , असंख्य विद्यार्थ्यांच्या स्मृतीचे- माळवणकर सर

कविवर्य मोरोपंत शिक्षणसंस्था,बारामतीचे संस्थापक व मएसो बारामती शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक कै.मावळणकर सरांचा आज स्मृतिदिन.

सर मराठी व इंग्रजी भाषा शिकवत.त्यांचं वाचन अफाट होतं.वर्गात शिकवताना पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जात सर अनेक नवनवीन बाबी सर विद्यार्थ्यांसमोर मांडत.

शिकवणं रंजक आणि विषयाची उत्सुकता वाढवणारं असायचं.खर्‍या अर्थाने ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांची पिढी ती.जीव ओतुन , समरसुन शिकवायचं,विद्यार्थ्याला सर्वांगाने तरबेज करायचं हा बाणा.त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये ते लोकप्रिय होते.

प्रचंड वाचनामुळेच की काय सरांना जाड भिंगाचा चष्मा होता.डाव्या हातात पुस्तक डोळ्यांच्या अगदी जवळ घेउन वाचायचं व दुसरीकडे फळ्यावर लिहायचं ही त्यांची लकब कायम लक्षात राहिली.

सरांमुळे शेकडो विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.

वक्तृत्व,निबंध स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्याला तत्काळ रोख बक्षिस देणं ही त्यांची खासियत होती.

अनेक गरजू विद्यार्थ्यांना सर अडचणीच्या प्रसंगी सढळ मदत करत,त्याची कधीही वाच्यता करत नसत.

सर अभाविपचं काम करत.परंतु आपलं शैक्षणिक कार्य चोख बजावून नंतरच्या वेळेत.

आणीबाणीविरोधात त्यांनी ठामपणे विरोध नोंदवला.त्याचे परिणाम धीराने भोगले.निर्भयपणे चुकीच्या बाबींना विरोध करत राहिले.प्रतिकूलतेविरोधात लढणं हे अंगचंच होतं.त्यामुळे त्यांना निर्भय बनो असा आव आणण्याची गरज पडली नाही कधी.
ग्राहक चळवळीकडे त्यांचा ओढा होता.त्यातुनच ग्राहक भांडाराची कल्पना त्यांनी बराच काळ यशस्वीपणे राबवली.

ग्राहक सभासदांकडून आगाऊ मागणी नोंदवून घेउन होलसेल दराने किराणा माल विकत घ्यायचा व तो ग्राहकांना वितरीत करायचा.ना नफा ना तोटा तत्वावर हे काम चालायचं.बारामतीतील सुप्रसिध्द एसकेआर (श्रीकृष्ण रेस्टाॅरंट) चे मालक मूर्तीअण्णा यांच्या सहकार्याने सरांनी कल्पक उपक्रम राबवला होता.विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हाॅटेल चालवून मिळवलेले उत्पन्न भूकंपसहायता निधीला दिले होते.
सर उत्कृष्ट संघटक होते.आमराई भागात कवि मोरोपंत संस्थेची शाळा त्यांनी उभारली.

त्या भागातील वंचित उपेक्षित जनसमुहासाठी ही शाळा वरदान ठरली.पुढे वडूजकर इस्टेट भागात संस्थेची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु झाली.संस्थेचा कार्यविस्तार वाढत गेला.

सरांचे चिरंजीव विनय यांनी म्हटल्यानुसार त्यांच्या वागण्याबोलण्यात एक सहजता होती.अखंड कार्यमग्न असूनही गडबड ,घाई नसे.नियोजनबध्द ,शिस्तशीरपणे ठरवलेले काम पार पाडण्याची हातोटी सरांकडे होती.त्यांचं बोलणं ठाम पण मृदू असे.त्यांची शरीरयष्टी पीळदार , बांधा बळकट होता.तरुणपणी नियमित व्यायाम केलेला असावा.सरांचं हसणं निर्व्याज होतं.

त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप समोरच्यावर पडत असे.सायकलवर किंवा चालत जात असत.

कोणी गाडीवर सोडायचा आग्रह केला तर अरे मी मुद्दाम चालत असतो,तुझा आग्रह मोडवत नाही म्हणुन बसतो असं हसत म्हणत गाडीवर बसत.साकोरीच्या माताजींवर त्यांची श्रध्दा होती.काही अध्यात्मिक साधनाही करीत असावेत.नक्की माहिती नाही.


अनेक विद्यार्थी सरांच्या शेवटपर्यंत संपर्कात होते.अनेक नामवंत डाॅक्टर्स , व्यावसायिक व्यस्ततेतुन वेळ काढत सरांशी गप्पा मारायला येत असत.कवी मोरोपंतांचं जे तैलचित्र सध्या प्रचलित आहे ते तयार करुन घेण्यात सरांचा महत्वाचा वाटा होता.

संस्था चालवताना अनेक तत्वांना मुरड घालावी लागली.संस्थेच्या कारभारात संस्थेच्या ,शिक्षक कर्मचार्‍यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी व्यवहार्य तडजोडी कराव्या लागत.

अनेकांची नाराजी, अपेक्षाभंग ओढून घ्यावा लागला.सर प्रांजळपणे ,स्पष्टपणे सर्व बाबी समोर मांडत.उभारलेली संस्था बळकटपणे उभी राहिली याचे समाधान त्यांना लाभले.
अखंड कार्यमग्न असणारे , तत्वे जोपासणारे , आपला ज्ञानसाधनेचा व ते मुक्तपणे वाटण्याचा वसा जपणारे , भरभरुन देत रहाणारे असे सर असंख्य विद्यार्थ्यांच्या स्मृतीत कायम आहेत.

सरांच्या पवित्र स्मृतीला विनम्र आदरांजली.

शब्दांकन : उदय कुलकर्णी सर

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on