शारदानगरमध्ये खेळाडूचे झाले मोफत प्रवेश
शारदानगरमध्ये गुणवंत खेळाडूंचा सत्कार
बारामती : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शारदानगर येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
मल्लखांब क्रीडा प्रकारात महाविद्यालयाची खेळाडू कु. श्रुती संतोष गुळवे हिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक तसेच विद्यापीठाच्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच कु. प्रतीक्षा आप्पासो पाटील हिने महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातील व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन्ही गुणवंत खेळाडूंचा संस्थेच्या विश्वस्त-सचिव सौ. सुनंदा पवार यांच्या हस्ते शारदा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या भव्य मल्टीपर्पज हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील १२ खेळाडूंना महाविद्यालयात मोफत प्रवेश व शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मा. सौ. सुनंदा पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या संस्थेतील उपलब्ध अत्याधुनिक क्रीडांगणे, जिम, जलतरणतलाव, सिंथेटिक ट्रॅक, इनडोअर हॉल इ. सोयी-सुविधांचा पुरेपूर वापर करून सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी विद्यार्थिनींना आपले नाव उज्ज्वल करा, तसेच क्रीडा कोट्याअंतर्गत उपलब्ध विविध शासकीय नोकरीच्या संधी व योजनांचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रा. बा. देशमुख, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आर. एस. देवकर, क्रीडा समिती सदस्य डॉ. जयवंत राठोड तसेच क्रीडा विभागातील सर्व खेळाडू उपस्थित होते.




