राज्यव्यापी यशाची ‘पाटी’ – विद्या प्रतिष्ठानच्या एकांकिकेचा दणदणीत विजय!
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रंगकर्मींनी सादर केलेली ‘पाटी’ ही सामाजिक भान आणि भावनांचे ठसठशीत दर्शन घडवणारी एकांकिका नुकत्याच पार पडलेल्या अजितपर्व राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत प्रेक्षकांच्या आणि परीक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन विजेतेपद पटकावले.
या एकांकिकेने ५१,००० रुपये रोख प्रथम पारितोषिक व करंडक पटकावला. इतकेच नव्हे, तर या सादरीकरणाने दिग्दर्शन व अभिनय अशा प्रमुख श्रेणींमध्येही वर्चस्व गाजवले.
सुबोधन जोशी व आदेश यादव यांना दिग्दर्शनासाठी प्रथम क्रमांक मिळाला. त्यांचे दृश्यरचनांतील सर्जनशीलता आणि सादरीकरणातील नेमकेपणा यांची प्रेक्षकांनी वाहवा केली. अभिनयाच्या विभागात श्रद्धा रंगारी हिने आपल्या संवेदनशील भूमिकेसाठी स्त्री अभिनयाचा प्रथम क्रमांक पटकावला, तर सुजल बर्गे याने पुरुष अभिनयाचा प्रथम क्रमांक मिळवून रंगभूमीवरील आपल्या प्रतिभेची मोहोर उमठवली.
‘पाटी’ ही एकांकिका सामाजिक आशय आणि मानवी भावनांचा सुरेख मिलाफ साधणारी, प्रगल्भ लेखनाने सजलेली आणि कसदार अभिनयाने भारलेली कलाकृती ठरली.
या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. हणमंतराव पाटील, मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. अमर भोसले आणि प्रा. विजयराव काकडे यांचे योगदान मोलाचे ठरले.
या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वाटचालीला नवा आयाम लाभला आहे. ‘पाटी’ने आजवर तब्बल ३८ पुरस्कार मिळवून महाविद्यालयाच्या गौरवात भर घातली आहे.
या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, सौ. सुप्रिया सुळे, सौ. सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, किरण गुजर, कर्नल श्रीष कंबोज आणि प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
‘पाटी’च्या भक्कम यशाने विद्या प्रतिष्ठानच्या रंगभूमीचा लौकिक अधिकच उजळून निघाला आहे!
