महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांसाठी तीन दिवसीय प्रक्रिया व गोदाम व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

0
18

महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांसाठी तीन दिवसीय प्रक्रिया व गोदाम व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

बारामती : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील १६ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ३२ महिला संचालकांसाठी धान्य व कडधान्य प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया तसेच गोदाम व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील भरडधान्य प्रक्रिया केंद्रात उत्साहात संपन्न झाले.
या प्रशिक्षणादरम्यान ट्रस्टच्या विश्वस्त मा. सौ. सुनंदाताई पवार यांनी महिला संचालकांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “देशात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रेसिड्यू फ्री अथवा सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन त्यातून उत्पादित होणाऱ्या मालावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करून गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ तयार करणे गरजेचे आहे.” तसेच मा. तुकाराम मुंढे यांच्या विभागामार्फत राज्यभरात सुरू असलेल्या कारवायांमुळे आपण किती भेसळयुक्त अन्न खात आहोत, याची जाणीव होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


महिलांच्या नेतृत्वाबाबत बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या, “महिलांना ३५ टक्के आरक्षण मिळाले असले तरी विविध पदांवर महिला गेल्यानंतर त्यांच्या निर्णयांमध्ये पुरुषांचा हस्तक्षेप दिसून येतो. या परिस्थितीत बदल होणे आवश्यक आहे. तुम्ही स्थापन केलेल्या कंपन्यांचे निर्णय तुम्ही स्वतः घ्या आणि त्या कंपन्यांना सक्षमपणे पुढे घेऊन जा.”
यावेळी त्यांनी सहभागी महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच महिला कंपन्यांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांना भीमथडी जत्रेत विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. महिला संचालकांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
प्रशिक्षणामध्ये धान्याची प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन, अन्न व्यवसायासाठी FSSAI तसेच गुणवत्ता नियंत्रणाची मूलभूत माहिती फूड एक्सपर्ट श्री. अमर केंजळे यांनी दिली.
भरडधान्याच्या द्वितीय प्रक्रियेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देताना श्री. वैभव यादव यांनी पास्ता, शेवया, पापड आदी विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती तसेच त्यासाठी आवश्यक उपकरणांची माहिती दिली.
सौ. पूर्वजा जोशी यांनी भरडधान्यापासून बिस्किटे, प्रीमिक्स तसेच विविध पाककृती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.
गोदाम व्यवस्थापन, गोदामाची ओळख, आवश्यक परवाने, बांधकाम व व्यवस्थापनाच्या विविध बाबींवर श्री. सुहास ननावरे यांनी मार्गदर्शन केले. तर भरडधान्याची ओळख, त्याचे प्रकार, पौष्टिक गुणधर्म तसेच प्रक्रिया केंद्रामध्ये उपलब्ध विविध सुविधांची माहिती श्री. अभिजीत देशमुख यांनी दिली.
या तीन दिवसीय प्रशिक्षणामुळे महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना धान्य व कडधान्य प्रक्रिया, मूल्यवर्धन, अन्न सुरक्षा, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन निर्मिती आणि गोदाम व्यवस्थापन याबाबत सखोल व्यावहारिक ज्ञान मिळाले. प्रशिक्षणामुळे महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक सक्षमपणे व्यवसाय उभारणी व बाजारपेठ विस्तारासाठी नवी दिशा मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here