महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथाला द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या वर्षी चित्ररथाची संकल्पना ‘नारीशक्तीवर आधारित होती. महाराष्ट्राने ‘नारीशक्ती व साडेतीन शक्तिपीठां’चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून सादर केला होता. त्यात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता ही तीन पूर्ण शक्तिपीठे, तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठाचे दर्शन पथसंचलनात उपस्थितांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजवणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त असे भक्तिमय वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्या माध्यमातून दर्शवले गेले,