भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या यशस्वी आयोजनानंतर कार्यकर्त्यांची स्फूर्तीदायी बैठक; ‘सोशल पेरेंटिंग’ चळवळीची घोषणा….!
बारामती, ता. ३ मे —(प्रतिनिधी, भारतीय संविधान विचार मंच, बारामती)
भारतीय संविधान विचार मंच, बारामतीतर्फे आयोजित ‘भीमपुत्र आयडॉल २०२५’ या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमानंतर मंचाशी संलग्न कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक १ मे रोजी पार पडली. ही बैठक बारामतीतील नीरा रोडवरील महाराजा हॉटेल येथे उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.

या बैठकीत मंचाचे अध्यक्ष राजेश कांबळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना त्यांचा गौरव केला. “भीमपुत्र आयडॉल २०२५ या कार्यक्रमाच्या यशामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा समर्पित सहभाग आहे. तुमच्या कष्ट, निष्ठा आणि संघभावनेमुळेच हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला,” असे सांगत कांबळे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

बैठकीदरम्यान एकमताने हा कार्यक्रम दरवर्षी घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे ‘भीमपुत्र आयडॉल’ ही एक वार्षिक चळवळ ठरणार असून, तरुणांमध्ये संविधानप्रेम, सामाजिक जागरूकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मंचाच्या माध्यमातून वर्षभरात सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली. युवकांना संविधानाचे महत्त्व, सामाजिक समता व न्याय यांची जाणीव करून देणाऱ्या कार्यशाळा, चर्चासत्रं आणि स्नेहसंमेलने अशा कार्यक्रमांची आखणी करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीत आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली — ‘सोशल पेरेंटिंग’ या नव्या चळवळीची सुरुवात. या उपक्रमाअंतर्गत पालकत्वाच्या सामाजिक भुमिकेचा अभ्यास, मार्गदर्शन आणि जनजागृती यावर भर देण्यात येणार आहे. आधुनिक समाजात जबाबदार नागरिक घडवण्यासाठी घराघरात संवेदनशील, संविधानप्रिय आणि समतावादी संस्कार रुजवण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे. लवकरच या चळवळीचे उद्घाटन तसेच कार्यशाळांची मालिका जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्मी आणि एकात्मतेची भावना निर्माण करणारी ही बैठक यशस्वी ठरली. येत्या काळात संविधान विचार मंचच्या विविध उपक्रमांतून सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान होईल, अशी दृढ भूमिका या बैठकीतून स्पष्ट झाली.
