भारतीय परंपरेचे संगोपन करणाऱ्या ‘इंडियन नॉलेज सिस्टिम’ प्रकल्प प्रदर्शनाने विद्यार्थ्यांत जागवली संस्कृतीची ओळख

0
77

भारतीय परंपरेचे संगोपन करणाऱ्या ‘इंडियन नॉलेज सिस्टिम’ प्रकल्प प्रदर्शनाने विद्यार्थ्यांत जागवली संस्कृतीची ओळख

बारामती – विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे संगणक, माहिती व तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि डेटा सायन्स विभागाच्या वतीने दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी ‘अष्टाङ्ग’ अंतर्गत ‘इंडियन नॉलेज सिस्टिम (IKS)’ या भारतीय चालीरीती, रूढी परंपरा आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निर्मल साहूजी उपस्थित होते. यावेळी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अनिल डिसले, डॉ. अपर्णा सज्जन, डॉ. अनिल हिवरेकर, डॉ. अनिल पाटील, प्रा. दीपक सोनवणे, प्रा. गौरी भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि वेदकालीन वेशभूषेत विद्यार्थ्यांच्या स्वागताने कार्यक्रमाला पारंपरिक शुभारंभ लाभला.

विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात विविध पारंपरिक विषयांवर आधारित भित्तिपत्रके, प्रतिकृती आणि सादरीकरणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा उलगडला. प्राचीन काळातील रोबोटिक्स संदर्भातील राजा भोजराज यांचे प्रयोग, मडक्यांद्वारे बनवलेले एसीचे आद्यस्वरूप, आयुर्वेदातील वनस्पती, सागरी मार्ग, मुद्राशास्त्र, वास्तुशास्त्र, नाडीशास्त्र, योगशास्त्र, शल्यचिकित्सा व प्राचीन विद्यापीठांचे अभ्यास विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे सादर केले.

हरिओम, तनवी, अयोध्या, रेणुका, सीमा, पवन, अनिकेत, नंदीनी, ऋचा, शिवराज, ईशांत, गायत्री आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व सूत्रसंचालन करत कार्यक्रमात चैतन्य आणले. कार्यक्रमातील वैशिष्ट्य म्हणजे अग्निहोत्र यज्ञाच्या माध्यमातून वातावरण भक्तिमय आणि सात्विक झाले.

प्राचार्य डॉ. लांडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘इंडियन नॉलेज सिस्टिम्स’ चा समावेश याचा विद्यार्थ्यांवर होणाऱ्या सकारात्मक प्रभावावर भर दिला. आयुर्वेद, वास्तुशास्त्र, गुरुकुल पद्धती व भारतीय परंपरांचे महत्व त्यांनी स्पष्ट केले.

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन विषय शिक्षिका प्रा. कल्याणी कुलकर्णी यांनी केले. भारतीय संस्कृतीचे प्रबोधन आणि नवतरुणांच्या मनात परंपरेची बीजे रुजवण्याचा सुंदर प्रयत्न या कार्यक्रमातून साकार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here