बारामतीत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी — मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहर दणाणले

0
44

बारामतीत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी — मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहर दणाणले

बारामती प्रतिनिधी |
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती बारामती शहर व तालुक्यात यंदा मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शहर व ग्रामीण उत्सव समित्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी सकाळी महात्मा फुले मंगल कार्यालय येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या पूजन प्रसंगी प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, नगरपरिषद मुख्याधिकारी पंकज भुसे, प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, आरोग्य अधीक्षक महेश जगताप , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. संध्याकाळी खंडोबा नगर महात्मा फुले चौक येथून सुरुवात झालेली मिरवणूक कसबा, मारवाडपेठ, सुभाष चौक, गांधी चौक, भिगवन चौक, तीन हत्ती चौक मार्गे शारदा प्रांगणात विसावली. या मिरवणुकीत उंट, घोडे, लेझीम पथक, ढोल-ताशा, पताका, तसेच महात्मा फुले यांचा भव्य पुतळा यांची विशेष आकर्षण होती. रथ, देखावे, सजवलेली वाहने, फटाके आणि प्रकाशझोतामुळे संपूर्ण बारामती उत्सवमय वातावरणात न्हालेली होती.

शारदा प्रांगण येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे हुबेहूब वेशभूषेतील कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक भोजनाने झाली.

या संपूर्ण आयोजनामध्ये शिस्त, लयबद्धता आणि बारामतीकरांची एकजूट प्रकर्षाने जाणवली. सर्वत्र फुले दाम्पत्यांचा जयघोष होत असताना, बारामतीच्या रस्त्यांवर खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचे सूर निनादले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here