बारामतीत ‘फ्लेक्स बोर्ड फॅशन’चा धुमाकूळ; स्वच्छ-सुंदर शहराला जाहिरातींच्या विळख्याचा विळखा!

0
5

बारामतीत ‘फ्लेक्स बोर्ड फॅशन’चा धुमाकूळ; स्वच्छ-सुंदर शहराला जाहिरातींच्या विळख्याचा विळखा!

प्रतिनिधी:
अपघातांचा धोका वाढला; प्रशासनाचे मात्र डोळेझाक धोरण? ‘फ्लेक्स संस्कृती’ला कोणाचा आशीर्वाद?
बारामती : एकेकाळी स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या बारामती शहरात सध्या एका नव्या ‘फॅशन’ची जोरदार चर्चा सुरू आहे. ही फॅशन म्हणजे चौकाचौकात, रस्त्यारस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी उभारले जाणारे फ्लेक्स बोर्ड!
शहरातील अनेक रस्त्यांवर आणि चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स बोर्ड उभारण्यात आले असून, त्यामुळे वाहनचालकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी फ्लेक्समुळे वाहतुकीचा मार्ग अरुंद होत असून, वाहनचालकांना अचानक वळण घेताना किंवा समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेताना अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, अपघातांचा धोका वाढला असून अनेक वाहनचालक जखमी झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहेत.
विशेष म्हणजे, बारामतीसारख्या नियोजनबद्ध शहरात ही ‘फ्लेक्स बोर्ड संस्कृती’ वाढत असताना संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. फ्लेक्स लावण्यासाठी नियम आहेत की नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच? असा संतप्त प्रश्नही आता विचारला जात आहे.
बारामती शहराची ओळख स्वच्छता, शिस्त आणि नियोजनासाठी आहे. मात्र, सध्या शहरातील अनेक भागांमध्ये दिसणारे फ्लेक्स बोर्ड पाहता, ‘स्वच्छ-सुंदर बारामती’च्या प्रतिमेला फ्लेक्सच्या विळख्याने वेढले आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, बारामतीचे नेते अजितदादा पवार यांनी शहराच्या विकासासोबतच शिस्त, स्वच्छता आणि एकोप्याला नेहमीच महत्त्व दिले आहे. मग शहराच्या सौंदर्याला आणि वाहतूक सुरक्षेला बाधा आणणाऱ्या या बेकायदा किंवा अनियंत्रित फ्लेक्सना कोणाचा वरदहस्त आहे? कोण कोणाला पाठीशी घालत आहे? याची चौकशी होणार का?
फ्लेक्स बोर्ड लावण्याच्या नावाखाली शहरातील सार्वजनिक जागा आणि रस्ते कोणाच्या मालकीचे झाले आहेत? हा प्रश्न आता बारामतीकरांच्या मनात निर्माण झाला आहे.
आज फ्लेक्समुळे वाहतुकीला अडथळा, उद्या अपघात, आणि परवा याच मुद्द्यावरून गट-तट निर्माण झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? बारामतीत वर्षानुवर्षे निर्माण केलेले एकोप्याचे वातावरण आणि विकासाची शिस्त अशा अनियंत्रित ‘फ्लेक्स फॅशन’मुळे धोक्यात येऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
बारामतीकर फ्लेक्सविरोधात नाहीत; मात्र शहराच्या सुरक्षिततेच्या आणि सौंदर्याच्या किंमतीवर चालणाऱ्या फ्लेक्स संस्कृतीविरोधात नक्कीच आहेत.
आता प्रशासनाने डोळे उघडून शहरातील अनधिकृत आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे फ्लेक्स तातडीने हटवावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
नाहीतर उद्या बारामतीची ओळख ‘स्वच्छ-सुंदर-हरित शहर’ म्हणून नव्हे, तर ‘फ्लेक्स बोर्डची राजधानी’ म्हणून होण्याची वेळ येऊ नये, एवढीच अपेक्षा!

Previous articleउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here