बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यावेळी ट्रॅफिकचा विस्फोट; विद्यानगरी चौकात पोलिसांची दमछाक, सिग्नलच्या मागणीला पुन्हा जोर..!

0
13

बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यावेळी ट्रॅफिकचा विस्फोट; विद्यानगरी चौकात पोलिसांची दमछाक, सिग्नलच्या मागणीला पुन्हा जोर..!

बारामती, दि. ५ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान विद्यानगरी (विद्या कॉर्नर) चौकात वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली, तर वाहनचालकांना दीर्घकाळ ताटकळत उभे राहावे लागले.
विद्यानगरी चौक हा बारामतीतील अत्यंत वर्दळीचा भाग मानला जातो. या परिसरात विद्या प्रतिष्ठानचे शैक्षणिक संकुल, विविध अकॅडमी, रुग्णालयांचे कॅम्पस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) तसेच एमआयडीसीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच व्हीआयपी दौरे वारंवार होत असल्याने वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होतो.


वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याच्या घाईत अनेक वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने किरकोळ अपघातही वारंवार घडत आहेत. मात्र, या महत्त्वाच्या चौकात अद्याप कायमस्वरूपी सिग्नल व्यवस्था नसल्याने प्रत्येक वेळी पोलिसांनाच वाहतूक नियंत्रणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.


शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यावेळी निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने पुन्हा एकदा विद्यानगरी चौकातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. त्यामुळे विद्यानगरी, सूर्यनगरी आणि एमआयडीसी परिसरातील नागरिकांनी तातडीने आधुनिक वाहतूक सिग्नल बसविणे, वाहतूक नियोजन मजबूत करणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
“व्हीआयपी दौरे वाढत आहेत; मग विद्यानगरी चौकात वाहतूक सिग्नल कधी बसणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून प्रशासनाने आता तरी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे बारामती ग्रामीण पोलिसांनाही मोठ्या प्रमाणावर ताण सहन करावा लागला. मर्यादित मनुष्यबळाच्या जोरावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, वाढती वाहतूक आणि वारंवार होणारे व्हीआयपी दौरे लक्षात घेता केवळ तात्पुरत्या उपायांवर अवलंबून न राहता विद्यानगरी चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा, सक्षम वाहतूक नियोजन आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरज अधिक तीव्रतेने समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here