बारामतीत ‘फटाका सायलेंसर’वाल्यांवर पोलिसांचा फडशा – १११ बुलेटस्वारांची शान झाली मातीत!
पोलिसांचा बुलडोझर चढला थेट बुलेटच्या गर्जनेवर; नागरिक म्हणाले – “हिच ती अस्सल कारवाई!”
बारामती, दि. ५ –
बारामतीत रस्त्यावर ‘धडधड’ करत झोपमोड करणाऱ्या बुलेटस्वारांची आता खैर नाही! शहरातील ध्वनीप्रदूषणाला कंटाळून अखेर वाहतूक पोलिसांनी ‘फटाका सायलेंसर’वाल्यांवर फटाफट बुलडोझर चालवला. थेट ५८ बुलेटस्वारांच्या गाड्यांवर कारवाई करत सायलेंसर काढून रस्त्यावर चिरडून टाकले! एकूण १११ जणांवर दंडात्मक कारवाई करत लाखोंचा दंड वसूल करण्यात आला.

ही धडक मोहीम पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली असून उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. मोहिमेचा टोकदार फटका इतका जबरदस्त होता की गल्ली ते मुख्य रस्ता, सर्वत्र ‘फटाका सायलेंसर’वाल्यांची भंबेरी उडाली!

सायलेंसर नाही, सायरन वाटावा असा आवाज करणाऱ्या या बुलेटस्वारांमुळे शहरातील रुग्ण, वृद्ध, लहान मूल यांचा जीव टांगणीला लागलेला. कॉलेज परिसर, हॉस्पिटल, सिग्नल अशा ठिकाणी एक प्रकारची ध्वनी दहशत निर्माण झालेली. कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांना यापुढे क्षमा नाही, असा स्पष्ट संदेश या मोहिमेने दिला आहे.

मंचावर होते हे रणझुंजार पोलीस योद्धे:
चंद्रशेखर यादव, सुभाष काळे, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे, सुधाकर जाधव, प्रशांत चव्हाण, अशोक झगडे, रेश्मा काळे, सीमा घुले, स्वाती काजळे, माया निगडे, सीमा साबळे, अजिंक्य कदम यांच्यासह गृह रक्षक दलाचे अमन मंडले, रोहित शिंदे, अभिषेक टेके यांनी ‘धडधड आवाजावर’ थेट पोलिसी धडक दिली.

१: ‘कायदा पाळा नाहीतर कारवाईला सामोरे जा’ – उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचा सज्जड इशारा
२: तुमच्या परिसरात असा बेकायदेशीर सायलेंसर असलेली बुलेट दिसली?
ताबडतोब कळवा – 9923630652 वर WhatsApp करा!
– पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव
शेवटी एवढंच म्हणावं लागेल –
‘फॅशनच्या नावाखाली कान फाडणाऱ्या आवाजांचा आता बारामतीत बँड वाजलाय! पोलिसांच्या या सायलेंसर मोहीमेला सलाम!’
