
निसर्गाची साद : नक्षत्र गार्डनमध्ये ‘नेचर वॉक’, पर्यावरणप्रेमींनी अनुभवला जैवविविधतेचा जीवंत स्पर्श!
बारामती | प्रतिनिधी
“देशी झाडे लावा, तीच आपला निसर्ग वाचवतील!” – असा थेट संदेश देत, सुप्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी निसर्गप्रेमींना निसर्गाशी जोडून टाकले! ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने नक्षत्र गार्डनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नेचर वॉक’ उपक्रमाने बारामतीकरांना निसर्गाचा नवा अर्थ शिकवला!

या प्रेरणादायी उपक्रमामागे होती फोरमच्या प्रमुख मार्गदर्शिका, खासदार सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांची पर्यावरणप्रेमी दूरदृष्टी. त्यांच्या सततच्या प्रेरणेतून फोरमकडून जलसंधारण, वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन, पर्यावरण शिक्षण यांसारख्या उपक्रमांनी बारामतीत हरित क्रांती उभी केली आहे!
या ‘नेचर वॉक’मध्ये सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींनी पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकला, देशी झाडांची ओळख घेतली, तर अनेकांनी प्रश्न विचारत डॉ. गायकवाड यांच्याशी थेट संवाद साधला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे अनेकांना पक्ष्यांचे अधिवास, आहारशैली, आणि जैवसाखळीतील महत्त्व समजले.





“फॅन्सी गार्डनिंगपेक्षा देशी झाडांचे रोपण करा. ती झाडं पक्षी, फुलपाखरं आणि स्थानिक जीवसृष्टीचं संरक्षण करतात,” असे स्पष्ट करत, गायकवाड यांनी जैवविविधतेचे प्रात्यक्षिक दाखवून दिले.


फोरमच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार, भविष्यात अशा उपक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. बारामतीकरांनी निसर्गाशी मैत्री करावी, झाडं लावावीत, आणि पर्यावरण संवर्धनाचा वसा पुढे न्यावा – हाच या उपक्रमाचा खरा गाभा!


ही ‘नेचर वॉक’ फक्त चालण्यापुरती नव्हती, ती होती एक जाणीव… एक साक्षात्कार… निसर्गाचा!