तीन दिवसांच्या पाठलागानंतर ‘ती’ चारचाकी अखेर ताब्यात!काळ्या काचा, साऊंड सिस्टम उतरवली; दंड आणि कोर्ट केससह बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई…!

0
16

तीन दिवसांच्या पाठलागानंतर ‘ती’ चारचाकी अखेर ताब्यात!
काळ्या काचा, साऊंड सिस्टम उतरवली; दंड आणि कोर्ट केससह बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई

बारामती | दि. ३१ मे
शहरातील रस्त्यांवर नियमांना ठेंगा दाखवत भरधाव धावणाऱ्या आणि पोलिसांना सलग तीन दिवस चकवणाऱ्या एका संशयित चारचाकी वाहनाचा अखेर बारामती वाहतूक पोलिसांनी छडा लावला! काळ्या काचा, नंबर प्लेटशिवाय भरधाव वेगात धावणाऱ्या या चारचाकीचा पाठलाग करत, पोलिसांनी जबर कारवाई करत वाहनचालकावर कडक कारवाई केली आहे.

२४ मे रोजी वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकाने काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली होती. या दरम्यान भिगवण चौक परिसरातून एक गाडी भरधाव वेगाने पोलिसांची नजर चुकवून पसार झाली. या गाडीवर ना नंबर प्लेट, ना विमा, आणि काळ्या काचा इतक्या गडद की, गाडीतील कुणी आहे हे ओळखणेच अशक्य!

पोलिसांनी तात्काळ सिटी इन चौकात गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी पुन्हा निसटली. पुढे २८ मे रोजी गांधी चौकात तीच गाडी पुन्हा दिसली, पण पुन्हा यश मिळाले नाही. अखेर, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तपासाची दिशा लागली आणि बारामती शहरातील माऊली नगर प्रगती रोड येथून ही गाडी ताब्यात घेण्यात आली.

कृष्णा अभिजीत क्षीरसागर (रा. माऊली नगर) या तरुणाकडे असलेल्या MH 06 AZ 8555 या क्रमांकाच्या गाडीवर खालील नियमभंग आढळले:काळ्या काचा
नंबर प्लेटचा अभाव विमा नसणे वाहन साऊंड सिस्टिममधून प्रचंड आवाज
या सर्व कारणांमुळे पोलिसांनी तब्बल ₹३५०० चा दंड आकारला असून, बेदारकारपणे वाहन चालवणे या अंतर्गत न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. काळ्या काचा उतरवण्यात आल्या असून साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली आहे. सदर वाहन सध्या बारामती वाहतूक शाखेच्या ताब्यात आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकातील सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे, प्रज्योत चव्हाण, स्वाती काजळे, सीमा घुले, सुधाकर जाधव आणि अजिंक्य कदम यांनी केली.

शहरात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना हा प्रकार चपराक ठरणार यात शंका नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here