
काळ्या काचा, नंबरप्लेटशिवाय भरधाव वाहन… उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा धडक कारवाईत सराईत गुन्हेगार गजाआड!
बारामती | प्रतिनिधी
पेन्सिल चौकाजवळ एका संशयित स्विफ्ट कारवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी थेट कारवाई करत एका तडीपार गुंडास ताब्यात घेतल्याने बारामतीत एकच खळबळ उडाली आहे.
माहिती अशी की, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड हे बारामती तालुका पोलीस ठाण्याकडे भेटीसाठी जात असताना, पेन्सिल चौक येथे भिगवण बाजूकडून भरधाव वेगात व संशयास्पद स्वरूपात येणारी काळ्या काचा व विनानंबरप्लेटची स्विफ्ट कार त्यांच्या लक्षात आली. लगेचच त्यांनी वाहतूक नियमन करणारे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना सदर वाहन थांबविण्याच्या सूचना दिल्या.


पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी तत्परतेने कार थांबवून चालकाकडे विचारपूस केली असता, त्याने आपले नाव राहुल राजेंद्र मदने (रा. प्रगतीनगर, बारामती) असे सांगितले. अधिक चौकशीदरम्यान समजले की, सदर गाडी ही त्याचा मित्र महेष बापूसाहेब चौधरी (रा. शिरूर, पुणे) याची आहे.

गाडीत इतर दोन व्यक्ती आढळून आल्या. त्यातील एकाचा परिचय अक्षय भिमराव कांबळे (रा. आमराई, बारामती) असा समजला. तपासात उघड झाले की, अक्षय कांबळे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात तडीपार प्रस्ताव प्रक्रियेत आहे. त्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी बारामती शहर पोलीस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले.
तसेच चालक राहुल मदने याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून, यावेळीही त्याने रहदारीचे नियम धाब्यावर बसवून भरधाव वाहन चालवले. याबाबत त्याच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करत आहे.
या धडक कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुनः एकदा दर्शन झाले आहे.

नागरिकांना आवाहन:
संशयास्पद व्यक्ती वा वाहन आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. आपला सहभागच सुरक्षिततेची हमी!