कर्मयोगी तत्वज्ञानी _अहिल्याबाई होळकर
( जन्म स्थान जामखेड मधील चौंडी (जि.अ.नगर) (३१/५/१७२५ -१३/८/१७९५)

0
189

भारतीय इतिहासातील एक अलौकिक असं व्यक्तिमत्व जे सामान्य कुटुंबात जन्मलेलं असतानाही एका वैभवशाली राज्याच्या त्या स्वामिनी बनल्या.कोण होत्या त्या?तर..
अभिमानानं काळीज भरुन यावं असं व्यक्तिमत्त्व होतं कर्मयोगी अहिल्याबाई होळकरांचं.
धनगर कुटुंबातील माणकोजी शिंदे व सुशिला शिंदे यांची हजरजबाबी ही मुलगी पाहताक्षणीच आपली सून म्हणून करवून घ्यावी असा मल्हाररावांना मोह झाला.
भारतीय इतिहासात मानाचं स्थान मिळवणं गोष्ट सहज आणि सोपी तर मुळीच नाही,नव्हती.
जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना चार हात करत परतावून लावणं ते ही एका स्त्रीनं.त्या काळी तर अशक्यच गोष्ट होती ही.
कमालीची सहनशीलता असणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणारं आहे.
साधं ,सोपं आणि सरळ आयुष्य जगत असताना प्रजेची सेवा आणि सदैव त्यांच्या हिताचा विचार करणं हा एक त्यांचा ठळक पैलू इथं मांडावासा वाटतो.


प्रजेतील गरीब जनतेला जास्तीत जास्त सुखांनं कसं जगता येईल? याचा विचार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नेहमी करत.
त्यांच्या जीवनातील एकेक पदर उलगडतांना जाणवलं की लोकमाता अहिल्याबाई या धैर्यवान, लढवय्या,धार्मिक तर होत्याच पण त्यांच्यात कमालीची शूरता आणि निर्णय क्षमता होती.
रणनिती तज्ञ म्हणून एक गडद अशी ओळख इतिहासात नोंदली गेली.
उच्च कोटीची दानशूरता त्यांच्या नसानसांत भिनलेली होती.म्हणूनच “महेश्वर” या त्यांच्या राजधानीत त्यांनी वस्त्रोद्योगास प्राधान्य दिले.ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या.पिण्याच्या पाण्याचे जागोजागी हौद बांधले.
काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत च्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नदीघाट बांधले. भक्तांसाठी अनेक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या.
दूरदृष्टी आणि न्यायदान या गोष्टी तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील धारदार पैलू आहेत असं म्हणणं वावगं ठरू नये.
न्यायदान तर त्या इतकं अचूक करायच्या की भांडणारी दोन्ही बाजूची मंडळी त्यांना दुवा देत.त्यांचं कौतुक करत.
न्यायदान करताना नात्याचा ही विसर पडत.
अपार शहाणपण, तडफदार बाणेदारपणा, खंबीर मन,या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ठळक वैशिष्ठ्ये ठरल्या.
मल्हारराव होळकरांच्या त्या सून आणि खंडेराव होळकर यांच्या त्या पत्नी म्हणून त्या आपल्याला परिचित असल्या तरी उत्तम प्रशासक, उत्तम संघटक,या पैलूनं त्यांची ओळख जगासमोर येते.
मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून इंदौर संस्थानचे मल्हारराव होळकरांना ओळखलं जातं.त्यांच्यानंतर हाच प्रशासकीय वारसा युगमाता अहिल्याबाईंनी हिंमतीनं पुढं चालवला.
त्यांची इतिहासातील एक खरी ओळख आपल्याला विसरुन चालणार नाही.सती प्रथेविरूध्द त्यांनी जो आवाज त्याकाळी उठवला तो निश्चितच नोंदणीय ठरला.
पतीच्या निधनानंतर मल्हारराव होळकरांनी त्यांना सती जाण्यास विरोध केला.म्हणूनच सती प्रथेविरूध्द लढण्यास त्यांना अधिक बळकटी मिळाली.
एका नजरेत हिशेब करण्यात तरबेज असणा-या अहिल्याबाईंनी महिलांसाठी भरीव योगदान दिले.
त्या घोडेस्वारीत तरबेज होत्याच.त्यांनी महिलांचे सैनिक दल तयार केले. शस्त्र आणि शास्त्र अवगत असणारं व्यक्तिमत्व होतं त्यांचं.
सा़ंसारिक दुखाचे अनेक घोट गिळत,पचवत, आप्तस्वकीयांची बंडखोरी सहन करत आदर्श राजकारण करत त्या पुण्यश्लोक पदापर्यंत पोहचल्या.हाच त्यांचा खडतर प्रवास लोकमाता म्हणून त्यांना स्वीकारतो . गोष्ट अभिमानाची आहे.
पराकोटीचं धैर्य,संयम, अन्यायाविरुद्ध चिड,सक्षम विचार व त्यांच्या या दैदिप्यमान कार्यास तसेच
ज्या मनगटात बळ, बुध्दी,चातुर्य आहे.तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो.असा संदेश मनामनांत पोहचवणा-या कर्मयोगी अहिल्याबाई होळकरांना जयंती निमित्त एक क्रांतिकारी अभिवादन आणि मानाचा मुजरा.

©️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.
(साहित्यिका/सामाजिक कार्यकर्त्या )
७७०९४६४६५३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here