एमआयडीसी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; बारामती कॅटल फीड्स प्रा. लि.च्या पुढाकारातून १५० वृक्ष लागवडीचा शुभारंभ

0
9

एमआयडीसी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; बारामती कॅटल फीड्स प्रा. लि.च्या पुढाकारातून १५० वृक्ष लागवडीचा शुभारंभ

बारामती | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बारामती एमआयडीसीतील कटफळजवळील पाण्याच्या टाकी परिसरात हिंदुस्तान फीड्स आयोजित गुरुवार, दि. ९ रोजी एमआयडीसीच्या सहकार्याने बारामती कॅटल फीड्स प्रा. लि. यांच्या पुढाकारातून भव्य वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत १५० वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे.
कार्यक्रमाला एमआयडीसीचे अधिकारी श्री. पेठकर, श्री. संदीप पाटील साहेब , तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री. कल्याण शिंगाडे, बारामती अग्निशामक दलाचे श्री. नलावडे, श्री गलांडे साहेब बारामती कॅटल फीड्स प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सचिन माने, बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. प्रमोदजी काकडे, शहाजी रणवरे, महावितरणचे श्री. कानतोडे, श्री. गावडे, हर्षल इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. पंढरीनाथ कांबळे, महालक्ष्मी सिमेंट पाईप इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. राजाभाऊ साळुंके तसेच एमआयडीसीतील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी श्री. पेठकर यांनी मनोगतात पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. बारामती एमआयडीसी परिसरात यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली असून, हरित परिसर अधिक समृद्ध करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.


बारामती कॅटल फीड्स प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सचिन माने यांनी सांगितले की, प्रादेशिक अधिकारी श्री. पेठकर आणि श्री. हनुमंतराव पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने १५० वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यांचे नियमित संगोपन, संरक्षण आणि देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीकडून पार पाडली जाणार आहे.
सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरला. उपस्थितांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करून हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बारामती घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here