एमआयडीसी कडून गेल्या सहा वर्षापासूनची जीएसटी वसुली अन्यायकारक बारामतीसह राज्यातील उद्योजकांचा तीव्र विरोध अन्यायकारक परिपत्रक मागे घेण्याची धनंजय जामदार यांची मागणी

0
144

एमआयडीसीने उद्योगांना दिलेल्या जवळपास ८० सेवांसाठी गेल्या सहा वर्षापासूनचा जीएसटी दंडव्याजासह भरण्याचे परिपत्रक नुकतेच काढले असून राज्यातील उद्योगांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. जीएसटी विभाग व एमआयडीसी मध्ये समन्वय नसलेने हा प्रसंग उद्भवला असून एमआयडीसीच्या चुकीची किंमत उद्योजकांना मोजायला लावत आहेत. हे अन्यायकारक असून जीएसटी भरणेचे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे केली आहे. बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोशिएशनच्या शिष्टमंडळाने एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता निलेश मोढवे यांना निवेदन दिले त्यावेळी धनंजय जामदार बोलत होते.

धनंजय जामदार पुढे म्हणाले एमआयडीसीकडून उद्योगांना जवळपास ८० प्रकारच्या सेवा पुरवण्यात येतात. यामध्ये बांधकाम परवानगी, भूखंड हस्तांतरण, नवीन भूखंड विक्री व्यवहार, पोटभडेकरूसाठी परवानगी, बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र, विकास शुल्क, भूखंडाचा वापर बदलणेची परवानगी, कंपनीच्या नावात बदल करणे, अग्निशमन सेवा, नवीन नळ जोडणी आदी सेवांचा समावेश आहे. उद्योगांनी या सेवा घेताना त्या त्या वेळेस एमआयडीसीच्या नियमाप्रमाणे शुल्क भरलेले आहेत. आता एमआयडीसीने १ जुलै २०१७ ते ४ सप्टेंबर २०२२ या पाठीमागील सहा वर्षापासूनच्या कालावधीत भरलेल्या शुल्कावर दंड व्याजासह जीएसटी भरण्याचे आदेश काढले आहेत. हा उद्योगांवर मोठा अन्याय असून बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख औद्योगिक संघटना आक्रमक झाल्या असून मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, विरोधी पक्षनेते व प्रसंगी मा न्यायालयाकडे दाद मागणार असलेचे धनंजय जामदार यांनी सांगितले.

या प्रसंगी बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, सदस्य अंबिरशाह शेख वकील, हरीश कुंभरकर, उद्योजक चंद्रकांत नलवडे, विजय झांबरे, संदीप जगताप, अनिल काळे, नितीन जामदार, आशिष पल्लोड, राजेंद्र पवार, अरुण चतुर, आप्पासाहेब जाधव, रावसाहेब पाटील, दीपक नवले, भूषण मोदी, एमएल शिंदे, सुधीर सूर्यवंशी, नितीन जाधव, संतोष कणसे आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एमआयडीसीच्या जीएसटी वसुली परिपत्रकाबाबत उद्योजकांच्या भावना तीव्र असून बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेले निवेदन तातडीने मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल अशी ग्वाही एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता निलेश मोढवे यांनी शिष्टमंडळाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here