उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत सायकल रॅली उत्साहात संपन्न
बारामती,आज सकाळी दि. ७ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती आणि बारामती सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली सायकल रॅली महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त वाहतूक आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला बारामतीतील सायकलप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तिरंगा सर्कल येथून रॅलीला प्रारंभ झाला असून शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुनावाला गार्डन येथे समारोप झाला.
यावेळी बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी सायकलिंगसारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
सायकल रॅलीद्वारे पर्यावरण संरक्षण, इंधन बचत, वायुप्रदूषण कमी करणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.






या यशस्वी आयोजनासाठी बारामती एन्व्हायरमेंटल फोरमच्या पदाधिकारी आणी बारामती सायकल क्लब सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. रॅलीचे नियोजन, समन्वय आणि व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. पर्यावरण जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या रॅलीमुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचला असून बारामतीकरांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप ( मामा) यांनी केले






