HomeUncategorizedआमच्या पप्पांनी गणपती आणला !

आमच्या पप्पांनी गणपती आणला !

आमच्या पप्पांनी गणपती आणला !

ढोल-ताशों का जोर है,
भजन मे भक्त विभोर है,
चारो ओर नजर घुमाओ,
गणपती बाप्पा मोरया का ही शोर है।

   आज श्रीगणेश चतुर्थी. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उत्सव म्हणून गणेशोत्सवाला प्रारंभ होण्याचा हा दिवस. तसे घरो-घरी पण गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळात दहा दिवस तर काही घरात दीड ते पाच दिवस किंवा दहा दिवसाचा गणपती बसविण्याची परंपरा आहे. श्रीगणेश चतुर्थीला वाजत गाजत, सजवून आणि गुलाल उधळत गणेश मुर्तीला घरात किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आणतात, आणि त्या अनुषंगानेच ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला!’, या गाण्याचीही महाराष्ट्रात सोशल मीडियावर धूम आहे. गणपतीचा माहोल करण्यात भर घालणार्‍या या गाण्याला माऊली घोरपडे आणि शौर्य घोरपडे यांनी गायलं आहे. याच गाण्यावर चिमुकल्या साईराज गणेश केंद्रे यानं रील व्हिडिओ बनवला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. एका आठवड्यात सुमारे ४० लाख एवढे व्ह्यूज आले. हजारोंनी तो शेअर केला. तर चिमुकली स्टार मायरा वैकुळ आणि साईराज यांनीही त्यांचे व्हिडीओ शेअर केले आहे. असो.
      ‘पप्पांनी घरात गणपती आणला’, हे खरे, मात्र गणपती कशाची देवता आहे? गणेशाची पौराणीक कथा काय आहे? लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक का केला? इंग्रज काळात याचा फायदा काय झाला? आज स्वातंत्र्यांनंतर या उत्सवाचे स्वरुप कसे बदलले? आज या उत्सवाची गरज आहे का? आज या उत्सवातून काय प्रबोधन होते? कोणते सामाजिक हित जोपासल्या जाते? या उत्सवाचे राजकीय फायदे कोणते? यामुळे धार्मिक तेढ का निर्माण होते? या व इतर अनेक प्रश्नांची उत्तरे एक माहिती म्हणून ‘पप्पांनी’ आपल्या मुलांना दिली पाहिजे. त्यांचे प्रबोधन केले पाहिजे.  
               सार्वजनिक गणेशोत्सवाला व प्रबोधनपर देखाव्याला कुणाचा विरोध असूच शकत नाही. मात्र त्यांचे पडद्याआड होणार्‍या प्रकारांना, वर्गणी मागण्यापासून ते धांगडधिंगा व कानठळ्या बसविणार्‍या डीजे विकृतीला मात्र नक्कीच विरोध असू शकतो. तसेच या उत्सवाच्या माध्यमाने होणार्‍या भांडणांना, धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या गैरप्रकारांना तसेच पोलीस कारवायांना नक्कीच विरोध असू शकतो. तेव्हा या उत्सवाचे सद्यस्थितीत सामाजिक महत्त्व व गरज तपासली पाहिजे.
       पुराणात बुध्दीची देवता म्हणून श्रीगणेशाचे स्थान प्रथम मानल्या गेले व पुजल्या गेले आहे. भारत देशात धार्मिकतेचा पगडा भक्कम आहे. तेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सन १८९४ साली हा गणेशोत्सव व्यापक स्वरुपात केला. राष्ट्रवादी विचारांचा प्रसार-प्रचार आणि स्वातंत्र्य चळवळीला हातभार लावण्याचा उद्देश या पाठीमागे होता. तसा या उत्सवाचा तेव्हा उपयोगही झाला.
         स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा उत्सव सुरु राहिला, मात्र उद्देशही बदलला व स्वरुपही बदलले. अनेक राजकारण्यांचे गणेशोत्सव मंडळ अशी ओळख होवून (काही मंडळांचा अपवाद वगळता) या माध्यमातून कार्यकर्ते व समर्थक गोळा करणे, त्यांचे मनसोक्त वर्तनाने ‘दांगळो’ करणे, उत्सवातून कार्यकर्ते व मते मिळविण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी जातीय दंगली घडविणे, पोलिसांमार्फत केसेस होणे आणि केसेस चालतात तेवढी वर्षे तो कार्यकर्ता आपल्या राजकीय पक्षाशी, समर्थक मंडळाशी बांधलेला असणे, पुन्हा-पुन्हा सत्ता प्राप्तीकरीता असे चक्र फिरणे, असे प्रकार घडत असल्याने गणेशोत्सवाचे मुळ स्वरुपच पालटले आहे. अगदी स्पष्टपणे सांगायचे म्हटले तर आजच्या स्वरुपातील गणेशोत्सवाची समाजाला गरज नाही. कारण यातून फारसे प्रबोधन होत नाही. सामाजिक व वैयक्तिक अशा स्त्रीभ्रृण हत्या, हुंडा, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, आदी ज्वलंत समस्या सुटण्यास या स्वरुपाचे उत्सवाने मदत होत नाही. या उत्सवाचे व इतरही उत्सव ज्यामध्ये दहीहंडी, कावडयात्रा, नवरात्री, दांडीया यांचा समावेश आहे, या उत्सवांचे राजकीय फायदे मात्र तेवढे होतात, किंबहुना त्यासाठीच आयोजन होते, हे कोणीही नाकारु शकत नाही.
         प्रत्यक्षात गणेशोत्सवच काय, इतरही सार्वजनिक उत्सवांना कुणाचाही विरोध नाही, मात्र त्यांचे स्वरुप समाजहिताचे, प्रबोधनाचे, शांतपणाचे, सर्वांना आनंद देणारे, आकर्षीत करणारे व ओढ लावणारे असे असावे, यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, एवढे मात्र खरे!
       शेवटी वेळ व काळानुसार बदल केला पाहिजे, या आशयाचा शेर आठवतो...  

ये वक्त गुजरता रहता है,
इंसान भी बदलता रहता है,
संभाल लो तुम खुद को जनाब
वक्त खुद चीख कर कहता है।

              राजेश राजोरे
       मो.नं. : ९८२२५९३९०३

[email protected]

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on