हैदराबादमध्ये मराठमोळ्या चवीचा सुगंध — आशाताईंच्या हातची भाकरी-भाजी
संपादक ; संतोष शिंदे 9822730108
कामानिमित्त अनेक जण महाराष्ट्रातून हैदराबादला जातात. परक्या शहरात आपलेपणाची ऊब आणि घरगुती जेवण मिळणे म्हणजे मोठा दिलासा असतो. अशाच एका मेहनती आणि जिद्दी मराठी कुटुंबाची भेट हैदराबाद येथे झाली — श्री सदानंद माने आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाबाई माने.
मुळचे वाकसा, मुक्काम पोस्ट ऊस तोरी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथील हे कुटुंब आज हैदराबादमध्ये स्वतःच्या कष्टावर संसार उभा करत आहे. दोन मुले आणि एक मुलगी यांचा सांभाळ करत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी मराठमोळ्या चवीची ओळख तिथे निर्माण केली आहे.
गवळीगुडा येथील सीबीएस बस स्टॉप जवळ, श्री साई जय दुर्गा लॉजच्या समोर आशाताईंच्या हातचे गरमागरम भाकरी-भाजीचे जेवण मिळते. घरगुती पद्धतीने बनवलेले वरण, वांग्याची भाजी, तिखट चटणी आणि गरमागरम भाकरी — अगदी आईच्या हातच्या जेवणाची आठवण करून देणारी चव!
फक्त ६० रुपयांत दोन गरमागरम भाकऱ्या, वरण, वांग्याची भाजी आणि चटणी असा साधा पण मन तृप्त करणारा बेत मिळतो. “वाह… क्या बात है!” म्हणत आम्ही त्या जेवणावर अक्षरशः ताव मारला. आशाताईंच्या हातची चव इतकी न्यारी आणि भारी की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा तिथे जावेसे वाटते.
हे उदाहरण सांगून जाते की महाराष्ट्रीयन माणूस कुठेही गेला तरी आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने स्वतःचे स्थान निर्माण करतो. पोटासाठी घरापासून दूर गेलेले हे लोक आपल्या संस्कृतीची आणि चवीची ओळख जपताना दिसतात.
म्हणूनच, आपण कधी हैदराबादला गेलात आणि सीबीएस बस स्टॉप परिसरात असाल, तर श्री जय दुर्गा लॉजच्या समोर जाऊन आशाताईंच्या हातचे गरमागरम भाकरी-भाजीचे जेवण जरूर चाखा. मराठमोळ्या प्रेमाची आणि चवीची खरी अनुभूती तिथे नक्की मिळेल.





