बारामती : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, २१ संचालक पदांसाठी तिरंगी लढत रंगणार आहे. अजित पवार गटाच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ आणि विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ अशी तीन पॅनेल मैदानात आहेत.
अजित पवार गटाच्या पॅनेलला शिवसेना (शिंदे गटाचा) पाठिंबा असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जात आहे. जय पवार यांच्या उपस्थितीत या पॅनेलची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. दुसरीकडे युगेंद्र पवार आणि राजेंद्रकुमार जगताप यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे समर्थन आहे.
दरम्यान, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी अजित पवार गटापासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. या पॅनेलला भाजपचे सहकार्य मिळाले आहे. जगताप यांच्या कारखान्यातील दीर्घ अनुभवामुळे या पॅनेलचीही चर्चा होत आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर सोमेश्वरची ही पहिली निवडणूक असल्याने त्यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याचा संदर्भही प्रचारात महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व, युगेंद्र पवारांचे आव्हान आणि पुरुषोत्तम जगतापांची स्वतंत्र भूमिका यामुळे निवडणुकीला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
ऊसदर, कारखान्याची आर्थिक स्थिती, शेतकरीहित, कारभार आणि भविष्यातील विकासाचे मुद्देही प्रचारात केंद्रस्थानी राहणार आहेत. ११ ऑक्टोबरला मतदान, तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून, सोमेश्वरच्या सभासदांचा कौल कोणत्या दिशेने जातो, याकडे बारामतीच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


