‘माझे जीवनच माझा संदेश’ : युगात्मा, महात्मा गांधी
सीधा-साधा वेश था,
ना कोई अभिमान।
खादी की एक धोती पहने
बापू की थी शान।
आज ३० जानेवारी. ७६ वर्षापूर्वी एक युगात्मा, महान आत्मा म्हणजेच महात्मा अशी पदवी जनतेतून मिळविणारे महात्मा गांधी आपल्यातून निघून गेल्याचा दिवस. महात्माजी गेले मात्र आजही संपूर्ण जगात त्यांचे ‘गांधी विचार’, त्यांचे मत व निर्णय, सोबतच कर्तव्याशी एकनिष्ठता, प्रामाणिकपणा, विनम्रता आणि अंहिसेचा मंत्र, असे बरेच काही चर्चेत आहेत, जीवंत आहेत, म्हणजेच गांधीजी विचाराने जीवंत आहेत, असे म्हणता येईल.
गांधीजी हे जगन्मान्य नेता होते. प्रत्यक्षात गांधीजींच्या शाश्वत विचारांची, नितीमुल्यांची कार्यपध्दतीची आजही तेवढीच गरज वाटते, आणि यातच गांधीजींचे यश आहे. जगातील शेकडो देशांनी त्यांचे डाक तिकीट काढणे, त्या-त्या देशात पुतळे बसविणे, ‘राजघाट’ चे दर्शन घेणे, लाखो लोकांनी त्या विचारांचा अभ्यास व संशोधनकार्य करणे, चर्चा-गोष्टींचे आयोजन होणे, गांधी विचार आत्मसात करणे व तसे जगणे, अस्पृश्यता न मानणे, हिंदू-मुस्लीम ऐक्य ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहणे, खादी स्वीकारणे, शेती व साफसफाई (स्वच्छता) करणे, अपरिग्रह (संग्रह न करणे) स्वीकारणे, स्त्री-पुरुषांनी सार्वजनिक कामात सहकार्याने वागणे, अशा कितीतरी गोष्टी गांधीजींनी शिकविल्या रुजविल्या. स्वातंत्र्य चळवळीसाठी तर त्यांनी स्वत:ला अर्पणच केले.
गांधीजींना व त्यांच्या विचारांना समजून घेणे व आवश्यक ती कृती करणे यासाठी त्यांनी लिहिलेले ‘सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा’ वाचले पाहिजे. त्यांच्यावर जगभरातील विद्वानांनी लिहिलेली काही पुस्तके, लेख तसेच महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या गांधी स्मृती समितीने १९६९ मध्ये प्रकाशित केलेला ‘युगात्मा’ हा स्मृतिग्रंथ, त्यातील गांधीजींना जवळून पाहणार्या, अनुभवणार्या थोरांचे लेख वाचले पाहिजेत. ‘‘एक मिनीट वाया जातो आहे तर तो परत कधी येत नाही, हे माहिती असतांना आपण कितीतरी मिनीटे वाया घालवितो’’, असे म्हणणारे महात्मा गांधी आजच्या कार्पोरेट जगात ‘मॅनेजमेंट गुरु’ वाटतात आणि त्यांचे सकारात्मक दृष्टीकोनाची, आंतरिक गुणांची व कार्यपध्दतीची चर्चा व अभ्यास होतो. ‘सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह’ ही त्यांची हत्यारे प्रत्यक्ष दिसण्यासाठी कमजोर वाटत असली तरीही खूप प्रभावी आणि आजही उपयोगात येणारी आहेत. आत्मकथन लिहितांना जगाच्या पाठीवर अत्यंत प्रामाणिक व्यक्ती म्हणून गांधीजींचा गौरव आजही कायम आहे.
हिंदू समाजात जन्मलेल्या गांधींनी लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले. वयाच्या २२ व्या वर्षी (१८९१) त्यांना व्यवसायासाठी भारतात बोलाविले तर २ वर्षे राहून १८९३ मध्ये एका व्यापार्याच्या दाव्यासाठी दक्षिण आफ्रीकेत गेले. तेथे २१ वर्षे कुटुंबासोबत राहिले. आणि तेथेच असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारीत सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम केला. महात्मा (संस्कृतमध्ये महान आत्मा, पूज्य) असा त्यांचा सन्माननीय उल्लेख प्रथम दक्षिण अप्रिâकेत १९१४ मध्ये केल्या गेला. नंतर १९१५ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी ते भारतात परतले आणि अन्यायकारक जमीनकर आणि भेदभाव विरोधात सर्वसामान्य लोकांना संघटीत करणे सुरु केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सुत्रे स्वीकारली आणि स्वराज्यासाठी देशभरात चळवळ सुरु केली.
साधी राहणी, शाकाहाराचा अवलंब, आत्मशुध्दीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. १९३० मध्ये ४०० कि.मी. ची दांडी यात्रा तर १९४२ मध्ये इंग्रजविरुध्द ‘भारत छोडो आंदोलन’, सुरु केले. अनेक वेळा तुरुंगवास भोगला. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला मुस्लिम राष्ट्रवादाचे आव्हान उभे ठाकले. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी स्वतंत्र भूमीची मागणी झाली. १९४७ मध्ये ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळविले. मात्र हिंदू-बहुल भारत आणि मुस्लिम-बहुल पाकिस्तान झाले. फाळणीच्यावेळी प्रामुख्याने पंजाब व पश्चिम बंगालमध्ये धार्मिक हिंसाचार झाला. गांधींनी पीडित भागांना भेटी दिल्या. धार्मिक हिंसाचार थांबविण्यासाठी अनेक उपोषणे केली. ७८ वर्षाचे गांधीजींचे शेवटचे उपोषण १२ जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत सुरु केले.
मुस्लीमांच्या बचावासाठी गांधीजी आग्रही होते. असा विश्वास भारतातील काही हिंदूंमध्ये पसरला यापैकी एक नथुराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत एका प्रार्थना सभेत छातीत ३ गोळ्या झाडून महात्मा गांधींची हत्या केली.
महात्मा, राष्ट्रपिता, बापू असे संबोधन असणारे महात्मा गांधींना आजच्या सामाजिक स्थितीत एक विचार म्हणून पाहिले तर ‘सबको सन्मति दे भगवान’ तसेच ‘खेड्यांकडे चला’ या सुत्रांचा अर्थ जास्त समजावून घेता येईल. एवढे मात्र खरे!
शेवटी गांधीजींच्या स्मृति प्रेरणा देतात, या आशयाच्या ओळी आठवतात…
चली थी अंग्रेजो के रुप मे
भारत देश पर आंधी…
अहिंसा और सत्य से लडे वो,
नाम था उनका गांधी…
– – – राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
खामगाव, जि. बुलडाणा.