सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा- प्रादेशिक सहाय्यक संचालक

0
22

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा- प्रादेशिक सहाय्यक संचालक मारुती मुळे

पुणे, दि. २९: सामाजिक न्याय विभागातर्फे २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘सामाजिक न्याय पर्व’ म्हणून साजरा करण्यात येत असून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पत्रकारांनी जनसामान्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक संचालक मारुती मुळे यांनी केले.

समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावर आयोजित पत्रकार कार्यशाळेत श्री. मुळे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य अपंग आणि वित्त व विकास महामंडळाचे से.नि. महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगीता डावखर, समाज कल्याण अधिकारी मीना अंबाडेकर, विशेष अधिकारी मल्लिनाथ हरसुरे सहायक लेखा अधिकारी इंदल चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. मुळे म्हणाले, ‘सामाजिक न्याय पर्व’ पंधरवड्यामध्ये तृतीयपंथीयांना ओळखपत्र उपलब्ध करुन देणे. त्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देणे, ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देणे. विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. समाज कल्याण विभागामार्फत यापूर्वी ‘सेवा पंधरवडा’ राबवून समाज कल्याणच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली.

श्री. फुले यांनी दिव्यांग कल्याण विभागाची माहिती देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी व उत्थानासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयांतर्गत समाज कल्याण विभागाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत झालेल्या बदलाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, समाजातील वंचित दुर्बल घटकांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत काम करण्यात येत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शासकीय व अनुदानित वसतिगृह, निवासी शाळा, आश्रम शाळा तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती स्वाधार योजना आदी योजनांचा समावेश आहे.

सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी समाजकल्याण अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध महामंडळांची कामे व योजना तसेच तृतीयपंथीयांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना व त्यांच्या अडचणी यावर प्रकाश टाकून समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती श्री. फुले यांनी दिली.

श्रीमती डावखर म्हणाल्या, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तळागळापर्यंत पोहोचवून वंचित घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा याकरिता विविध योजनांची प्रसार व प्रसिद्धी माध्यमांद्वारे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here