शिक्रापूर पोलिसांकडून दोन महिन्यांत तब्बल ६७ वाहने मूळ मालकांच्या ताब्यात

0
2

शिक्रापूर पोलिसांकडून दोन महिन्यांत तब्बल ६७ वाहने मूळ मालकांच्या ताब्यात

सप्टेंबरमध्ये १३ लाख ६० हजार, तर ऑक्टोबरमध्ये २३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल परत; दोन महिन्यांत ३७ लाख २० हजारांची वाहने मालकांना सुपूर्द; शिक्रापूर पोलिसांचा अभिनव उपक्रम

शिक्रापूर दि.१९

 गुन्हे, अपघात आणि बेवारस स्थितीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाहनांचा शोध घेऊन ती पुन्हा मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची उल्लेखनीय कामगिरी शिक्रापूर पोलिसांनी केली आहे. अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ६७ वाहने शोधून त्यांचे मूळ मालक गाठत पोलिसांनी ३७ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परत केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अनेक वाहनमालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
    शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्यांतील, अपघातांतील तसेच बेवारस स्थितीत मिळालेली अनेक वाहने दीर्घकाळ पडून होती. या वाहनांचे मूळ मालक शोधून त्यांना वाहने परत देण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, वाहनांचे आरटीओ क्रमांक, चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास करण्यात आला. त्यातून संबंधित वाहनमालकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही वाहने मालकांच्या ताब्यात देण्यात आली.

शिक्रापूर पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी १३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ३२ दुचाकी मूळ मालकांच्या ताब्यात दिल्या होत्या. त्यानंतर १८ व १९ ऑक्टोबर रोजी आणखी २३ लाख ६० हजार रुपये किमतीची ३५ दुचाकी व चारचाकी वाहने परत करण्यात आली. अशा प्रकारे दोन महिन्यांत एकूण ६७ वाहने आणि ३७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाला आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेली वाहने पुन्हा मिळवण्यासाठी अनेक नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. मात्र, तांत्रिक माहितीच्या आधारे वाहनांचा शोध घेऊन ती मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्याच्या या प्रयत्नामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ गुन्ह्यांचा तपास करण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या मालमत्तेची परतफेड करण्यासाठीही शिक्रापूर पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे या कारवाईतून दिसून येते.

चौकट –
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात अद्यापही काही बेवारस वाहने आहेत. संबंधित वाहनमालकांनी वाहनाच्या मालकी हक्काचे पुरावे आणि आवश्यक कागदपत्रांसह पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अन्यथा, नियमानुसार संबंधित वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया करण्यात येईल.

  • चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे. अधिक माहितीसाठी मुद्देमाल कारकून एन.डी.नाईकडे मो. ७५८८१४५३७० किंवा पोलीस निरीक्षक यादव यांचे ९९२३६३०६५२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे, अक्षदा पाणमंद यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. लाखो रुपयांची वाहने मूळ मालकांना परत देत शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांच्या विश्वासाला अधिक बळ दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here