विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची वार्षिक पालक सभा यशस्वी संपन्न

0
148

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची वार्षिक पालक सभा यशस्वी संपन्न


विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची पालकसभा १२ एप्रिल २०२४ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमासाठी पालकांचे प्रतिनिधी म्हणून लाभलेल्या दोन पालकांचा प्रातिनिधिक स्वरूपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर व डॉ. अपर्णा सज्जन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथम सत्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचा सत्कार प्राचार्य व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. अपर्णा सज्जन यांनी प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विषयी उपक्रम राबविले गेले व त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जो सक्रिय सहभाग घेतला याची तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अंतर्गत गुणाची विभागणी कशी होते, याची संपूर्ण माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून छोट्याशा पडद्यावर अत्यंत चांगल्याप्रकारे समजेल अशा ओघवत्या भाषेत सांगितली. डॉ. अविनाश कोळेकर यांनी स्वायत्त महाविद्यालयात परीक्षा पद्धती कशी असते, त्याची गुणविभागणी कशी असते, परीक्षा घेण्याच्या पद्धती काय आहेत तसेच या परीक्षा पद्धतीचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो याची माहिती सर्व उपस्थितांना दिली. डॉ. अनिल हिवरेकर यांनी आपल्या महाविद्यालयाला जो स्वायत्ततेचा दर्जा मिळाला त्या बद्दल आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाचे विस्तृत विवेचन केले. प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांनी आपल्या भाषणात स्वायत्त महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त आहे, तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये कसे महत्वपूर्ण भूमिका बजावून विद्यार्थी आपल्या निवडलेल्या विद्याशाखे बरोबर इतर विद्याशाखांमध्ये सुद्धा कसे प्राविण्य प्राप्त करू शकतो या बद्दल सविस्तर माहिती दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश हा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा, यांच्यामध्ये समन्वय असावा व आपल्या पाल्याची प्रगती हि पालकांना कळावी त्याचबरोबर आपल्या पाल्याच्या सर्वागीण विकासासाठी महाविद्यालय कोणकोणते उपक्रम राबविते याची कल्पना पालकवर्गाला असावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी भोईटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्याशाखांचे सर्व विभाग प्रमुख तसेच प्रथम वर्ष विभागात अध्यापन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हे सर्व उपस्थितीत होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. नितीन जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले व या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here