राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

0
4

राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यासाठी शालेय क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या – उपमुख्यमंत्री

बारामती, दि.२८: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू एका दिवसात तयार होत नाहीत. त्यांच्या प्रवासाची सुरुवात शालेय जीवनापासून होते. म्हणून शालेय क्रीडा स्पर्धांकडे केवळ उपक्रम म्हणून न पाहता गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यासाठी आणि त्यांच्यातील गुण ओळखुन त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी शालेय स्पर्धा महत्वाच्या ठरतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

बारामती येथे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व बारामती स्पोर्ट्स अकॅदमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपसंचालक माणिक पाटील, युवराज नाईक,बारामती स्पोर्ट्स अकॅदमीचे दादासाहेब आव्हाड, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, संभाजी होळकर, विनायक गावडे, राजवर्धन शिंदे तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त शांताराम जाधव, राज्यभरातून आलेले प्रशिक्षक, खेळाडू, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, कबड्डी हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे. या खेळाने अनेक पिढ्यांना शिस्त, नेतृत्व आणि संघर्ष करण्याची ताकद दिली. या खेळामध्ये एका खेळाडूला चमकण्याची संधी असते. अंतिम विजय पूर्ण संघाच्या एकजुटीवर अवलंबून असतो. राज्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन ठोस पावले उचलत असून खेळाडू केंद्रित दृष्टिकोन ठेवून काम सुरु आहे.

त्या म्हणाल्या, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण खेळाडू आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द न सोडणाऱ्या प्रत्येक खेळाडू पर्यंत सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. ही स्पर्धा केवळ राज्यस्तरीय स्पर्धा नसून महाराष्ट्रातील भविष्यातील कबड्डीपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणारा महत्त्वाचा टप्पा आहे.

महाराष्ट्राच्या क्रीडा विकासात मुलींचा सहभाग वाढवा, जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, खेळातून आपल्या पालकांचे, शाळेचे नाव उज्ज्वल करा,खेळातील प्रामाणिकपणा, शिस्त आणि प्रतिस्पर्धी मित्रांचा सन्मान करा, सातत्याने मेहनत करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. ओरिसा, बेंगलोर व चेन्नई येथील सर्व प्रकल्पांना भेट घेऊन पाहणी करावी. तेथील क्रीडा सुविधांचा अभ्यास करून कटफळ येथील क्रीडा संकुल बांधताना समावेश करावा, अशा सूचना क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रास्ताविकात श्री. लकडे यांनी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ८ विभागातून १५० खेळाडू, मार्गदर्शन व्यवस्थापक, पंच सहभागी झाले असल्याचे सांगितले. बारामती शहराला २०१८ नंतर राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाल्याचे सांगून जिल्हा क्रीडा संकुलामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here