मी – माझे,  व अहंकार

0
273

मी – माझे,  व अहंकार
 
“गर्जतो सागर अहंकाराचा, मनी असा उन्माद आहे
ओहोटीची जाण नाही, ‘मी’पणाचा मला नाद आहे”
माणूस अगदी जन्मल्या पासून मी , माझे स्वताचे अशी नैसर्गिक भावना बाळगून जगत असतो, पुढे वय वाढल्यावर हा मी पणा अहंकारामध्ये रुपांतरीत होतो. असे का होते एवढे मी पणा चे व्यसन का लागते ते आपण आपला स्वताचा खोलवर विचार केला तर समजून येऊ शकते , पण समजून घेऊन त्या वृत्ती मध्ये सकारात्मक बदल आपण स्वताच घडवून आणावा लागतो. केवळ मी पणा मुले आपली नाती , प्रेमाचे लोक , मित्र , घराचे जवळचे व्यक्ती कायमचे तुटतात, दूर जातात.
आपण सर्वांत जास्त विचार कशाचा करतो – स्वतःचा! मी, माझं, मला.. मी बिझी आहे, माझा वेळ, माझी गाडी, माझं घर, मला असंच लागतं, मला असं वाटतं, मी.. मी.. मी.. आपले अस्तित्व, आपला विचार लहान करून ठेवतो. लहान का, तर हे सगळं आपण आपल्या शारीरिक अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. चूक आहे का? तर नाही, पण क्षुद्र नक्कीच आहे. हे जग खूप विशाल आहे. पण आपण आपलं जग अगदी समुद्रासमोर एका थेंबाप्रमाणं करून ठेवतो. तो थेंब विसरतो की खरंतर तो त्याच समुद्राचा अंश आहे आणि त्यानं स्वतःकडं त्याच विशालतेनं पाहिलं पाहिजे.
कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा जसा शेवटी विषात रूपांतरीत होतो; तसेच ‘मी’पणाचेही आहे.
आपण आपल्यातील ‘मी’ जाणून घेण्यासाठी किती उत्सुक असतो? आपण कायम आपली इतरांशी तुलना करीत असतो. त्यांच्याप्रमाणे वागण्याचा आणि तसे होण्याचा प्रयत्न करीत असतो. हा खरेतर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्यातील ‘मी’चा अपमानच असतो.
अनेकदा आपल्या माणसाची जवळ असताना किंमत कळत नाही, पण दूर गेल्यावर मात्र चैन पडत नाही. बरोबर जगताना प्रेम करायचं, समजून घ्यायचं, चुकलं तर माफ करायचं असतं. त्याऐवजी आपलाच अहं कुरवाळत बसतात सगळे. हा अहं कुरवाळत बसल्यामुळे मेंदूवर एक प्रकारची धुंदी येते , मग ह्या तून सर्व नाती दुरावल्यावर नंतर स्वत:चा रागराग करीत जगतात. येणारा जाणारच कधीतरी. भेटलेला दुरावणारच. आपलं वागणं तर असतं ना आपापल्या हातात. गेलेले-दुरावलेले मनात असतात ठाण मांडून. परुंतु आपल्या मी पणा मुले तुटलेल्या माणसाना , नात्यांना परत कसे जोडायचे ह्यातच संपूर्ण आयुष्य संपते.
व्यक्तिमत्त्व नावाच्या मूल्याशी केलेली ती प्रतारणाच असते. आपल्याकडे मुलांना नेहमी बजावले जाते, ‘अमक्यासारखा हो, तमक्यासारखा हो.’ पण तुझ्या रंगाने, गंधाने आणि अंगभूत गुणांनी बहरलेले तुझे व्यक्तिमत्त्व आम्हाला हवे आहे, असा आग्रह कोणी धरत नाही.
जोपर्यंत ‘मी’ हा स्वत्वाची खूण
म्हणून काम करीत असतो, तोपर्यंत त्या ‘मी’पणाला आणि पर्यायाने येणाऱ्या अहंकाराला माणसाचा दागिना किंवा सद्गुण म्हणून स्वीकारले पाहिजे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या अहंकराचे गर्वात रूपांतर होते आणि ते त्या माणसाच्या जडणघडणीला हानीकारक ठरू शकतो
ह्या मी पणा वर कवियत्री बहिणाबाई यांचा एक टोमणा आहे एका कवितेत
“मी कोण मी कोण
मी पणाची मरीमाय
देखा हिची आशी तर्‍हा
सोता सोतालेच खाय “.
उदाहरणार्थ आपण ज्याला माझं घर म्हणतो ते खरंच आपलं असतं का? समर्थ रामदास स्वामी ग्रंथराज दासबोधामध्ये म्हणतात –
‘मुष्यक म्हणती घर आमुचे | पाली म्हणती घर आमुचे | मक्षिका म्हणती घर आमुचे | निश्चयेसी|| कांतण्या म्हणती घर आमुचे | मुंगळे म्हणती घर आमुचे | मुंग्या म्हणती घर आमुचे | निश्चयेसी |’
ज्या घराचा तुम्ही कष्टाने इएमआय भरत आहात त्याला तुमच्या घरातील उंदरे, पाली, माश्या, वाळवी, मुंगळे, मुंग्या, झुरळे, ढेकूण हे सुद्धा त्यांचंच घर समजतात. पुढं जाऊन ते हेही म्हणतात की जसे घर खरे आपले नाही, तसे तुमचे शरीरसुद्धा तुमचे खरे नाही. पोटातील जंत, दातातील कीड हेही आपल्या शरीराला त्यांचंच समजतात. जरा स्वतःच्या आयुष्याच्या गुंत्यातून बाहेर येऊन लांब जा, छोट्या ”मी”ला जरावेळ विसरून सर्वत्र पसरलेल्या विशाल ‘मी’कडं पाहा. या अफाट विश्वाचं आकलन फक्त माणूसच करून घेऊ शकतो इतकी विलक्षण क्षमता आहे आपल्यात.
या जगात आपल्या सर्वांना काय प्रिय आहे? असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला, तर हजारो व्यक्ती या सर्व प्रश्नांची हजारो निरनिराळी उत्तरे देतील. कारण बहुतांश लोक गोंधळात तथा अज्ञानात आहेत. कोणाला पैसा, कोणाला सत्ता, कोणाला प्रतिष्ठा, कोणाला आरोग्य, कोणाला प्रसिद्धी, कोणाला शिक्षण, कोणाला मुले-बाळे, कोणाला पत्नी, कोणाला पती, कोणाला जात, कोणाला धर्म, कोणाला राष्ट्र, कोणाला काही प्रिय आहे. अशी अक्षरश: हजारो उत्तरे येतील. आपण अशा निरनिराळ्या उत्तरांविषयी वादविवाद करणार नसून अशा सर्व मान्य उत्तराचे चिंतन करणार आहोत, ज्याविषयी वाद होणार नाही. आपण असे चिंतन करणार आहोत जे सर्वमान्य असेल, जे वैश्विक असेल, जे सार्वत्रिक असेल. सर्वच वादातीतपणे मान्य करतील असे सर्वमान्य उत्तर आहे, प्रत्येकासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे “मी”, “मी” इतकी प्रिय गोष्ट आपल्यासाठी दुसरी नाहीच. हे कोणीही अमान्य करणार नाही.
अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा ‘मी’ इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो. माणूस समाजनिष्ठ प्राणी आहे. एकटा जगू शकत नाही.
आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात. ‘मी’चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. मी कोणीच नाही ही भावना असावी. ‘अहं’चा त्याग केला की आपण सोSहं च्या मार्गावरून जातो.‘अहंकाराचा वारा न लागो मनाला‌’ असं समाजावलं की जगणं उज्ज्वल होतं..
कर्तृत्वाची शिखरे गाठल्यानंतर असे अलगद ‘मी’पण गळून पडण्यात एक वेगळा अर्थ आहे. तो समजावून घेता आला, तर अहंकार दागिना म्हणून मिरवण्यात कोणालाही धन्यताच वाटेल.
मी पणा किंवा स्वतः विषयीच्या काही भ्रामक कल्पना..! आपण कोणीतरी खास आहोत, आपण फार हुशार किंवा बुद्धीमान आहोत, आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते, आपण दादा आहोत, आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात. आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घराण्याची अब्रु अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. आपला अहंकार कुरवाळत असतात. मग या साठी शत्रुत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात, पण ज्यांना अहंकार, मी पणा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात. एकदा तरी आपला इगो बाजूला ठेवा.. विसरा.. सोडून द्या.. बघा काय चमत्कार होतो ते..! जरा थोडसं, आत्मपरिक्षण करा…
संकलक : सुहास सावगावकर 
(BScIT, PGDCA, MSW, MA PSYCHOLOGY, LLB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here