महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बणवणारा डिफेन्स एक्स्पो – विशेष लेख ….

0
86

विशेष लेख

महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बणवणारा डिफेन्स एक्स्पो

एक वेळ अशी होती की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहचवणारी अश्वशक्ती क्षमता आहे. आपल्या पीएसएलव्ही म्हणजेच भूउपग्रह प्रक्षेपण यानाचे यश याच इंजिनावर अवलंबून आहे. रशियाच्या नकारानंतर आपल्या वैज्ञानिकांनी दूरदृष्टी दाखवत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून काही वर्षातच क्रायोजेनिक इंजिन तयार केले. तेव्हापासून भारतीय वैज्ञानिकांनी इतर देशांसमोर हात पसरण्यापेक्षा वेळोवेळी आव्हाने स्वीकारत देशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करत अंतराळ संशोधनात आज पहिल्या पाच देशांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

हीच स्थिती संरक्षण शस्त्रास्त्रे व साहित्य खरेदीबाबतही होती. अमेरिका शस्त्रास्त्रे निर्मिती करण्यात आणि विकण्यातही अग्रेसर आहे. याचप्रमाणे, रशिया, फ्रांस, इजराईल, उत्तर व दक्षिण कोरिया हे देशही यात आघाडीवर आहेत. पण आज भारत अनेक शस्त्रास्त्रे स्वदेशी बनावटीची वापरतो. स्वदेशी तंत्रज्ञान ही संकल्पना सरंक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात सरंक्षण उत्पादने तयार करणाऱ्या एमएसएमई देशात तयार झाल्या आहेत. आज देशात मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य निर्माण होत आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर असुन राज्यात १० ऑर्डंनन्स फॅक्टरी आणि ५ डिफेन्स पीएसयू आहेत. टाटा, भारत फोर्ज, सोलार, एल ॲंड टी, महिंद्रा, निबे अशा मोठ्या कंपन्या राज्यात संरक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपादने तयार करीत आहेत.

भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे’ आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे हा एक्स्पो होत आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील या प्रकारातील हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो आहे.

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने वायुसेना, नौसेना आणि स्थलसेना या तीनही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. या एक्स्पोमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतील. यात एल ॲंड टी, महिंद्रा, टाटा, डीआरडीओ आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या -पीएसयु (PSUs) यासह विविध प्रतिष्ठित उद्योगातील तज्ज्ञ असतील. हा एक्स्पो महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून निश्चितच पुढे नेणारा ठरणार आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका
भारताच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्वाची आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे देशाच्या ४० पैकी १० संरक्षण उत्पादन आणि आयुध निर्माण करणारे कारखाने महाराष्ट्रात आहेत. मुंबई हे भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय आहे. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेले पुणे, भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचेही (NDA) मुख्यालय आणि सरंक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) देखील याच जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे सशस्त्र सेना वैद्यकिय महाविद्यालय आणि मुनिशन इंडिया लिमिटेडचे मुख्यालयदेखील पुण्यात आहे. भारतीय लष्कराचे आर्मड् कॉर्प्स स्कूल आणि सेंटर (ACS&C) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर आहे. लष्कराशी संबंधित एवढ्या मोठ्या यंत्रणा एकाच राज्यात असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

एक्स्पोची मुख्य उद्दिष्टे

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग( MSME) डिफेन्स एक्स्पो हे एक अभूतपूर्व प्रदर्शन असणार आहे. या क्षेत्रातील नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासोबतच संरक्षण क्षेत्रातील प्रमुख खरेदीदार म्हणजे तीनही सैन्य दल आणि विक्रेता यांच्यातील संपर्क वाढवणे, महाराष्ट्रातील डिफेन्स एमएसएमईची तयार झालेली इकोसिस्टम अधिक बळकट करण्यासोबतच संरक्षण क्षेत्रातील खरेदीदारांसाठी अर्थपूर्ण संवाद निर्माण करणे, यासोबतच व्यवसायाच्या परस्पर फायदेशीर संधी ओळखण्यासाठी ‘डायनॅमिक फोरमची’ स्थापना करणे, संरक्षण उत्पादन क्षेत्रात नावीन्यपूर्ण उद्योजकतेची संस्कृती जोपासणे, अत्याधुनिक उपायांच्या विकासास प्रेरणा व प्रोत्साहन देणे, धोरणात्मक उपक्रम राबवून शाश्वत आणि मजबूत वाढीसाठी आवश्यक सहाय्य प्रदान करून महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राच्या विस्तारासाठी सक्रियपणे योगदान देणे, महत्त्वाच्या क्षेत्रातील एमएसएमईसाठी अनुकूल संधी निर्माण करून खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील संपर्क मजबूत करणे हे या एक्स्पोमागील महत्त्वाचे उद्देश आहेत.

शिवाय महाराष्ट्रात डायनॅमिक एमएसएमई जाळ्यासाठी एक मजबूत आणि टिकाऊ पुरवठा साखळी फाउंडेशनची स्थापना करणे, संरक्षण उत्पादन आणि निर्यातीसाठी मार्ग मोकळा करणे, शैक्षणिक-उद्योग सहकार्याच्या प्रगतीद्वारे राज्य आणि राष्ट्रासाठी एक शक्तिशाली परिसंस्था उत्प्रेरित करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

महाराष्ट्राचे सक्षमीकरण: एमएसएमई, संरक्षण आणि तंत्रज्ञान
महाराष्ट्रातील स्टार्ट-अप कंपन्यांद्वारे तयार केले जाणारे काही भविष्यकालीन स्वदेशी तंत्रज्ञान हे संरक्षण तंत्रज्ञान क्रांतीचे पुढचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे राज्य या क्षेत्रात निश्चितच आघाडी घेईल यात शंका नाही. यातील महत्वाच्या बाबी अशा आहेत.
हवाई देखरेखीसाठी ड्रोन- पुरवठा आणि ड्रॉप डाऊनची क्षमता असलेले हे पहिले आणि एकमेव मानव-पोर्टेबल स्वायत्त ड्रोन आहे.

व्हिजन प्रोसेसिंग सिस्टीम उत्पादन- रणांगणाचे रिअल-टाइम चित्रण दाखवते. प्रगत इमेजिंग आणि सेन्सर तंत्रज्ञान एकत्र करते; यात दिवस आणि रात्रीचे चित्रण दाखवण्याची क्षमता आहे.

जैव-पॉलिमर प्लॅटफॉर्म – जखमेच्या काळजीसाठी आधारित उत्पादने- हे बायोएक्टिव्ह मायक्रोफायबर जेलिंग तंत्रज्ञानावर आधारित हेमोस्टॅटिक मलमपट्टी करते.

रोबोटिक सोल्यूशन्स- एकत्रित कार्यरत प्रणाली (युनिफाइड ऑपरेटिंग सिस्टीम) अनेक क्षेत्रांमध्ये जोडलेले रोबोट्स व्यवस्थापित करण्यात मदत करते.

दृष्य पाळत प्रणाली- हे संरक्षण आणि एरोस्पेस संस्थांसाठी उच्च-स्तरीय इलेक्ट्रो-ऑप्टिक पाळत ठेवणारी प्रणाली आहे .

लढाऊ शस्त्र प्रणाली – या टाक्या इंजिनसह मागील चाकांना शक्ती पुरवणारा मोटारीच्या यंत्राचा भाग, लढाऊ चिलखत,युद्ध भूमीवर ॲंटीड्रोन संरक्षण प्रणालीसह एकत्रीकरणासाठी तयार केल्या आहेत.

अशा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह महाराष्ट्र या एक्स्पोमध्ये आपली क्षमता सिद्ध करेल. त्याचबरोबर या प्रदर्शनात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी प्रत्येक सत्रात होणारा संवाद विद्यार्थ्यांच्या भविष्यातील कारकिर्दीला वेगळा आयाम आणि प्रेरणा देणारा ठरेल. यातूनच भविष्यात काही नाविन्यपूर्ण स्टार्ट अप्स सुरु होतील यात शंका नाही.

मनीषा सावळे
वरिष्ठ सहायक संचालक
माहिती व जनसंपर्क.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here