मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता सामुहिक प्रयत्न करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

0
25

मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता सामुहिक प्रयत्न करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. 12: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, विविध गृहनिर्माण संस्था, आस्थापना, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. येत्या 20 नोव्हेंबर रोजी लोकशाहीच्या बळकटीकरणाकरीता अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्यादृष्टीने पुणे महानगरपालिका भवन येथे सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच विविध व्यापारी आस्थापनांचे प्रतिनिधी यांच्या समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर संजय राऊत, सहायक कामगार आयुक्त दत्ता पवार, सहकारी गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सचिव कर्नल प्रमोद दहितुले आदी उपस्थित होते. यावेळी विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रीय श्रमिक महासंघाचे पदाधिकारी, क्रेडाईचे पदाधिकारी आदी उपस्थित होते

डॉ. दिवसे म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदार मतदानापासून वंचित राहिल्याबाबत तक्रार आल्यास संबधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहनांची आवश्यकता आहे अशा दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यास वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर तसेच उपलब्धतेप्रमाणे प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध करण्यात येणार आहे, असेही डॉ. दिवसे म्हणाले.

डॉ. भोसले म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्याहद्दीत असलेल्या ३ हजार १७६ मतदान केंद्रावर स्वच्छता, व्हीलचेअर, विद्युत व्यवस्था, स्वच्छ शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुरेशी पार्किंग व्यवस्था नसलेल्या मतदान केंद्रांजवळ ३३१ ठिकाणे मतदानाच्या दिवसासाठी तात्पुरती वाहनतळे म्हणून घोषित करण्यात येतील. प्रत्येक महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयात ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या (नो युवर पोलिंग स्टेशन)’ याकरीता हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे. या सुविधेचा लाभ घेवून येत्या 20 नोव्हेंबर रोजी अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.

यावेळी उपस्थितीत पदाधिकारी, नागरिकांनी तसेच विविध आस्थापनेच्या व्यापाऱ्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता प्रशासनास सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here