बालकांची जडणघडण व व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त लेट्स अचिव्ह

0
135

बालकांची जडणघडण व व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त लेट्स अचिव्ह

लक्ष्मण जगताप यांच्या लेट्स अचिव्ह या पुस्तकात मुलांना उत्तम शिक्षण देण्याबरोबरच ते शिक्षण कसं आत्मसात केले पाहिजे याचा विचार लेखकांनी केला आहे. मुलाचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी शिक्षणाबरोबर इतर अनेक गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टीकडे पालक सहसा लक्ष देत नाहीत.
इतर पूरक गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव हे पुस्तक वाचल्यानंतर होते. परीक्षेत यश मिळवणे जितके महत्त्वाचे आहे तितके आपले मूल समाजात एक उत्तम नागरिक म्हणून त्याने कसं असावे हे सुध्दा महत्त्वाचे आहे.
आपल्या मुलाने उत्तम गुण मिळवले पाहिजे अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. पण हे गुण मिळवताना मुलाची क्षमता व मनाची अवस्था समजावून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मुल एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्याला भाव भावना असतात, त्याच्या काही क्षमता असतात. याचा विचार पालक करीत नाहीत. मुलं घडत असताना ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्या गोष्टीविषयी खूप छान मार्गदर्शन यात केले आहे. पालक आणि मुले यांच्या अनेक बाजू यात मांडल्या आहेत.

पुस्तकाची प्रस्तावना किशोरबालभारतीचे संपादक किरण केंद्रे यांनी लिहिली असून पाठराखण शिक्षण व मेंदूतज्ञ डॉ .श्रुती पानसे यांनी केली आहे. जीवनात काहीतरी मिळवण्याचं प्रत्येकाचं ध्येय असते. ते ध्येय साकार करण्यासाठी मूल आणि पालक दोन्ही प्रयत्नशील असतात. त्यात मुलांची भूमिका कशी असावी आणि पालकांची भूमिका कशी असते या दोन्ही बाजू समजावून घेणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा अनेक पालक केवळ एकांगी विचार करतात आणि अपेक्षेने अनावश्यक ओझे मुलांवर लादत असतात. त्यामूळे त्या अपेक्षेच्या ओझ्याने मुल घडण्या ऐवजी वेगळेच काहीतरी होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रत्येक पालकाने मूल समजावून घेतले पाहिजे. मूल समजावून घेणे हे किती गरजेचे आहे याची प्रचिती हे पुस्तक वाचून येणार आहे.
मुले आणि पालक यांच्यात योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
पालक आणि मुले यांच्या दोन्ही बाजूचा विचार यात मांडला आहे. लेखक शिक्षक असल्याने मुलांचे बालमानसशास्त्र त्यांना चांगले अवगत झाले आहे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी बाबत यात त्यांनी एक वैचारीक आणि अनुभवजन्य मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाला समुपदेशनाची जोड आहे. त्यामूळे यातील लेखांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
या पुस्तकात मुलांसाठी काही उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात आरोग्य, छंद, वाचन, श्रम,नीटनेटकेपणा, सकारात्मक विचार, अभ्यास करण्याचे तंत्र, जिद्द, यश, अपयश,व्यवहारज्ञान, वाचन, पुस्तक मैत्री, परीक्षा, मस्तपणे जीवन कसं जगावं, जीवनातील खेळाचे महत्व, सुट्टी, मित्र, वक्तृत्व, विज्ञान यासारख्या अनेक विषयावर चिंतन मनन करून लेख लिहले आहेत.
मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे यंत्र नव्हेत, मुले हिंसक का बनत आहेत, मुलांचे ऐका, शिक्षणाचे माध्यम, प्रेमाचा अर्थ, अति स्तुती, मार्क्स देणारे मशीन यासारख्या अनेक लेखातून मार्गदर्शन आणि प्रबोधन केले आहे.
लहान असताना वडाच्या झाडाला खेळलेल्या सूर पारंब्या, आबंट चिंचा व बोरे खाताना आलेली मजा तर काही निराळीच असते. आईच्या कडेवर आणि बाबांच्या पाठकुळीवर बसण्यात मिळालेले सुख मिळते हे मोठेपणी कशातच मिळत नाही. लहानपणी शाळेतील मित्रांबरोबर खेळण्यात मिळालेल्या आनंदाची सर मोठे झाल्यावर कितीही खेळले तरी त्याला नाही.
मुले म्हणजे देवाघरची फुले या लेखातील हा एक छोटासा भाग आहे. लेखक लेखन करत असताना केवळ फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावत नाहीत तर जीवन समृद्ध कसं होत याविषयीं लिहताना खरं जीवन, बालपण कसं असावे याविषयीं एक ललित गद्य वाचावे असेच लेखन करून प्रत्येकाच्या बालपणाचं मोरपीस अंगावर फिरवतात.
वाचन संस्कृती आणि वाचन माणसाच्या जडण घडणीत किती उपयुक्त आहे याविषयी वाचनविषयी आणि पुस्तकविषयक लेखात लिहताना ते लिहतात,
अनेक संस्कारांपैकी महत्त्वाचा असणारा संस्कार म्हणजे वाचन होय. लहान मुलांच्या बाबतीत तर त्याचे खूप महत्त्व आहे. बाळाच्या भरण पोषणासाठी आईचे दूध महत्त्वाचे असते. तितकेच महत्त्व मुलांच्या संस्कारासाठी वाचनाचे आहे. झाडाला खत पाणी वेळेवर दिले की ते चांगले वाढते, बहरते, फुलते. त्याप्रमाणे वाचनाने मुलांचे व्यक्तिमत्त्व आकारास येते. बोधकथा, संस्कारकथा, रहस्यकथा, बिरबल बादशाहाच्या कथा, आत्मचरित्रे इ. वाचल्याने मुलांच्या जडणघडणीवर मोठा सकारात्मक परिणाम होतो. शब्दसंपत्तीत वाढ व भर पडते. याचा फायदा म्हणजे वक्तृत्वकला आणि लेखनकला उत्तम प्रकारे विकसित होते. एकंदरीत त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यासाठी वाचन एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करते.अशा सगळ्या मुद्यांना स्पर्श करणारे हे पुस्तक मुले व पालकवर्गाला निश्चितच उपयुक्त आहे.

प्रा. कुंडलिक शांताराम कदम
तळेगाव ढमढेरे. शिरूर. पुणे
पुस्तकाचे नावलेट्स अचिव्ह
लेखकलक्ष्मण जगताप
प्रकाशकपरीस पब्लिकेशन पुणे
मूल्य -२००रु.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here