बारामती साहित्यकट्टा – ३५ : साहित्यिक संवादाने मंत्रमुग्ध करणारा सोहळा
बारामती साहित्यकट्ट्याचा ३५ वा सत्र नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि लेखक बाबासाहेब सौदागर उपस्थित होते. त्यांच्या मनोगताने आणि किस्स्यांनी संपूर्ण उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
साहित्याचा स्वच्छंद प्रवास
साहित्यिक सृष्टीत प्रत्येक लेखक, कवी, गीतकार यांचा स्वतःचा एक स्वतंत्र मार्ग असतो. काही जण जन्मतःच साहित्यिक प्रतिभेने समृद्ध असतात, तर काहींना स्वतःचे स्थान निर्माण करावे लागते. बाबासाहेब सौदागर हे अशाच आत्मनिर्मित साहित्यिकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या अनुभवांच्या आणि संघर्षाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
कार्यक्रमात त्यांनी साहित्यिक प्रवासातील अनुभव, गमतीदार प्रसंग आणि व्यावसायिक अडचणी उलगडून दाखवल्या. विशेषतः चित्रपटसृष्टीतील गीतलेखन कसे बदलले आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. “आजकाल गीतकारांना स्वच्छंदीपणे लिखाण करण्याची संधी मिळत नाही. संगीतकारांच्या सुरांमध्ये शब्द बसवणे एवढेच काम उरले आहे,” असे त्यांनी सांगितले.
हास्य आणि लावणीच्या रंगतदार गप्पा
कार्यक्रमादरम्यान त्यांनी अनेक किस्से सांगितले, ज्यात “आयटम सॉंग” आणि “लावणी” या विषयांवरील चर्चा विशेष रंगली. लावणी सेंसर बोर्डाच्या अडचणी कशा टाळाव्यात, यावर त्यांचे निरीक्षण अत्यंत मार्मिक होते. “तुमच्या टेंब्याने मशाल पेटवा, उसाच्या फडात खुरपायला नेऊ नका” यासारख्या लावण्यांच्या ओळींनी उपस्थितांना हास्याची मेजवानी दिली.
त्यांनी आपल्या वक्तृत्वातून जीवनाच्या तत्त्वज्ञानालाही स्पर्श केला. “तंबूला जेवढा ताण तेवढाच तो मजबूत असतो” आणि “गळ्यात हार आणि पाठीत प्रहार” यांसारख्या सहजसोप्या म्हणींनी त्यांनी जीवनाचे सार स्पष्ट केले.
बारामती साहित्यकट्टा – एक आगळीवेगळी संकल्पना
बारामती साहित्यकट्ट्याच्या या यशस्वी पर्वामागे शशांक मोहिते आणि संपूर्ण टीमचा मोठा वाटा आहे. दर महिन्याला साहित्याच्या प्रेमासाठी आयोजित केला जाणारा हा कट्टा नवोदित आणि अनुभवी साहित्यिकांना एकत्र आणतो. बाबासाहेब सौदागर यांच्या उपस्थितीने या सत्राला एक वेगळीच उंची मिळाली.
या अविस्मरणीय अनुभवासाठी बाबासाहेब सौदागर यांना मानाचा मुजरा आणि बारामती साहित्यकट्टा टीमचे मनःपूर्वक आभार!
- डॉ. उपेंद्र सुवर्णा रमेश गलांडे
