बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भव्य ‘नमो महारोजगार मेळाव्या’सह विविध विकास कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

0
87

भव्य ‘नमो महारोजगार मेळाव्या’सह विविध विकास कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बारामती, दि. २: नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची एक मोठी संधी मिळाली आहे असे सांगतानाच बारामती येथे आयोजित या मेळाव्यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे असेही यावेळी ते म्हणाले.

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने आयोजित पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बारामतीतील विविध विकास कामांतर्गत बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखा, बारामती पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतींचे उद्घाटन पोलीस वाहनांचे लोकार्पणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात तरुणाईला मार्गदर्शन मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल. यापूर्वी नागपूर, लातूर, अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथे आयोजित हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून यातून २५ हजार युवांना रोजगार मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बारामती शहर विकासाचे मॉडेल
बारामती शहर हे एक विकासाचे प्रारूप (मॉडेल) आहे. शहराच्या विकासात शरद पवार, अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. विकासकामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येते.

१ लाख ६० हजार रोजगार दिले
राज्यात यापूर्वी नोकरभरती बंद होती. या शासनाने ७५ हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत १ लाख ६० हजार रोजगार दिले आहेत. विविध नोकर भरती सुरू असून २२ हजार पोलिसांची भरती, ३० हजारावर शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेलेही समाविष्ट आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासन आपल्या दारी मध्ये २ कोटी ६० लोकांना लाभ
शासन आपल्या दारी हा देखील राज्य शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून विविध योजना, शासन निर्णय असताना तसेच लाभार्थी असतानाही शासकीय कार्यालयात जाण्याची कटकट नको म्हणून लाभ सोडून देणाऱ्या नागरिकांना लाभ देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. यात एकच छताखाली गरिबांना घरांचा, महिला बचत गट, शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, हार्वेस्टर आदी अनेक लाभ दिले. या कार्यक्रमातून २ कोटी ६० लाख लोकांना विविध लाभ देण्यात आले.

प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमात राज्याचे पूर्ण योगदान
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला थेट नियुक्तीपत्रे देण्याचा कार्यक्रमांतर्गत जवळपास १० लाख युवकांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्य शासनही यात कुठेही कमी पडणार नाही. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत १ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन शिक्षण धोरणामधील अभ्यासक्रमातही कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून रोजगार देणारे हात निर्माण करण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात दाओस येथे जवळपास ५ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून यातून ४ ते ५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

बारामती-विकासाचे मॉडल
पोलीस हा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असताना सणवार, उत्सव, आंदोलने आदी कालावधीत ऊन, पाऊस वाऱ्यामध्ये रस्त्यावर उभा असतो. म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांना दर्जेदार सुविधाही दिल्या पाहिजेत. त्या बारामतीतील या पोलीस वसाहतीत दिल्या आहेत. राज्यातील सर्व बसस्थानके सर्व सोई सुविधायुक्त अशी सुसज्ज ‘बसपोर्ट’ करून प्रवाशांना सर्व सोई सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून बारामतीमध्ये राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक झाले आहे.

राज्यातील शासकीय इमारती बांधताना बारामतीच्या इमारती समोर ठेवणार- देवेंद्र फडणवीस
बारामतीचे बस स्थानक एखाद्या विमानतळासारखे वाटावे असे आहे, तसेच येथील पोलीस ठाणे, पोलीस उपमुख्यालय, पोलीसाकरीता इमारती या सरकारी बांधकामासारखे न दिसता या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयासारखे वाटते. अतिशय सुंदर इमारती झाल्या असून बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तूचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. राज्यात इमारती बांधण्यासाठी या इमारतीचा आधार घेण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बारामतीतील विकासकामांचे कौतुक केले.

शासकीय कार्यालये चांगली असली पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे. अशा कार्यालयात अधिकारी व कर्मचारी चांगले काम करुन नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचे काम करतील, अशी विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, एकीकडे उद्योगांना मनुष्यबळाची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज लक्षात घेऊन ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे आयोजन निर्णय घेण्यात आला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार असून त्यांच्या हाताला काम देण्याचा हा उपक्रम आहे. रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेल्या उमेदवारांनी चांगले काम करावे.

नागपूर येथे आयोजित पहिल्या नमो महारोजगार मेळाव्यात ११ हजार तरुणाला रोजगार मिळाले असून त्यापैकी काहींना ५० लाखापर्यंत पॅकेज मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणात उच्च वेतनाच्या नोकरीपासून ते दहावी शिक्षण घेतलेल्या तरुणाला रोजगार मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्राचा नमो महारोजगार बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ५५ हजार पेक्षा अधिक पदे अधिसूचित करण्यात आली असून ३६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्यापर्यंत आणखीन अर्ज येतील. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरुन ५ व्या स्थानी आणली गेली असून येत्या तीन ते चार वर्षात काळात जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याकरीता प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उघडण्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून तरूणांना कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतले आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

बारामती तालुका राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार-अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या चार सुंदर इमारतींचे आज लोकार्पण करण्यात आले. पोलीस उप मुख्यालयाच्या इमारतीसाठी १३२ कोटी रुपये, पोलीस वसाहत साठी ७५ कोटी रुपयांचा खर्च आला. बारामतीचे नूतन बस स्थानक महाराष्ट्रातील क्रमांक एकचे बस स्थानक आहे. खूप चांगल्या दर्जाची कामे झाली आहेत. विविध विकास कामांसाठी निधीची देखील कमतरता कमी पडू दिली जाणार नाही.

पोलीस विभागाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आज ३९ वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यात १४ महिला वाहन चालक आहेत. महिलांना देखील संधी प्राप्त करून दिली जात आहे. महाराष्ट्रात बारामती हा क्रमांक एकचा तालुका येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याने जर्मनीबरोबर एक करार केला असून त्यांना ५ लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी मनुष्यबळ कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक उमेदवारांना रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषीमूल शिक्षण संस्था आयटीआय तसेच मालेगाव येथील शासकीय आयटीआय येथे विविध १५ ते ३० दिवसांचे कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यातून रोजगार मिळू शकणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध-मंगल प्रभात लोढा

श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्रात प्रथम नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या रोजगार मेळाव्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बारामती येथील रोजगार मेळाव्यात उद्योजकांनी ५५ हजार ५५७ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. याठिकाणी २५४ उद्योजकांनी सहभाग घेतला असून ३८ हजार ७४४ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. याव्यतिरिक्त ऑनलाईन नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात कौशल्य विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील १ हजार महाविद्यालयात नोकरीच्या दृष्टीने ३ महिन्याचे कौशल्य विकासाचे कोर्स सुरू करण्यात येतील. राज्यातील बेरोजगार तरुणांना जो पर्यंत रोजगार मिळत नाही तो पर्यंत कौशल्य विभाग विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या, विभागाच्यावतीने युवक युवतींच्या पंखांना बळ देण्याचे काम करतो. २ हजार ठिकाणी प्रमोद महाराज कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून सहा ठिकाणी आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करत आहोत. पहिला नमो महारोजगर मेळावा १० डिसेंबर का नागपूर केला होता त्याची फलश्रुती पाहून ३ महसुली विभागात आयोजित मेळाव्यात ४० हजार मुलांना रोजगार देण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्येष्ठ नेते श्री. पवार म्हणाले, विद्यार्थ्यां रोजगाराची गरज लक्षात घेऊन राज्यात नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्य शासन प्रयत्न करीत आहे. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही गेल्या ३ वर्षात सुमारे २ हजार ५०० विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोज कुसेकर, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here