बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची वार्षिक पालक सभा यशस्वी संपन्न

0
212

विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची वार्षिक पालक सभा यशस्वी संपन्न
विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची पालक सभा महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमासाठी पालकांचे प्रतिनिधी म्हणून लाभलेले श्री. सुरेश शिंदे व श्रीमती. राजश्री काकडे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर व डॉ. अपर्णा सज्जन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यानंतर प्रथम सत्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले, तसेच वर्गात चांगली उपस्थिती दाखविली, विविध कार्यक्रमात चांगले यश संपादन केले

अशा विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबविले व ते विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त आहेत याची संपूर्ण माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून डॉ. अनिल हिवरेकर व डॉ अपर्णा सज्जन यांनी छोट्याशा पडद्यावर अत्यंत चांगल्याप्रकारे समजेल अशा ओघवत्या भाषेत सांगितली.

तसेच विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती, वेळेचे योग्य नियोजन, अभ्यास, याचे विद्यार्थी जीवनातील महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती या वार्षिक सभेला लाभली होती.

प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर यांनी आपल्या भाषणात या महाविद्यालयात गेली पाच वर्षात महाविद्यालयाने केलेली उत्कृष्ट कामगिरी तसेच काम करीत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावर केलेली मात याचा ऊहापोह केला. तसेच हे महाविद्यालय हे या देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाच्या यादीत पहिल्या १० मध्ये यावे असा मनोदय व्यक्त केला. या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश हा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा, यांच्यामध्ये समन्वय असावा व आपल्या पाल्याची प्रगती हि पालकांना कळावी त्याचबरोबर आपल्या पाल्याच्या सर्वागीण विकासासाठी महाविद्यालय कोणकोणते उपक्रम राबविते याची कल्पना पालकवर्गाला असावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती कुलकर्णी व प्रा. दीपक सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष विभागात अध्यापन करणारे सर्व शिक्षक तसेच, डॉ. निर्मल साहूजी, डॉ. दिनेश हंचाटे, डॉ. अनिल डिसले, डॉ. अनिल पाटील, श्रीमती. पौर्णिमा सरोदे, श्रीमती गौरी भोईटे, हे सर्व उपस्थितीत होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर यांचे मोलाचे मागर्दर्शन लाभले. डॉ. नितीन जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले व या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.

या कार्यक्रमानंतर उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here