बारामती एमआयडीसीला आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील – धनंजय जामदार
बारामती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र वेगाने विकसित होत असून नवीन लहानमोठ्या उद्योगांची सातत्याने भर पडत आहे.औद्योगिक विकास होत असताना उद्योगांना आवश्यक अनेक सुविधांची गरज देखील वाढत आहे. शासनाकडून सोईसुविधा मिळवणेसाठी असोसिएशन नेहमीच प्रयत्नशील असते असे प्रतिपादन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले. मऔवि महामंडळाकडून बारामती एमआयडीसी अग्निशमन केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका दाखल झाली, त्याचा शुभारंभ करताना धनंजय जामदार बोलत होते.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर, अग्निशमन केंद्रप्रमुख सुनील इंगवले, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह शेख, सदस्य महादेव गायकवाड, हरीश कुंभारकर, कॉटनकिंगचे खंडू गायकवाड, टेक्स्टाइल पार्कचे अनिल वाघ, उपअभियंता उपेंद्र गलांडे, दीपक नवले, जनार्दन चौधर, माधव खांडेकर व अग्निशमन केंद्र कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनंजय जामदार म्हणाले बारामती औद्योगिक क्षेत्राचा विस्तार विचारात घेता अग्निशमन केंद्राला रुग्णवाहिकेसह ट्रस्ट टाइप अल्युमिनियम लॅडर, वॉटर ब्राउझर, हायड्रॉलिक रेसक्यू कटर अँड स्प्रेडर, एयरबैग विथ कंट्रोलर, हाइड्रॉलिक रॅम जॅक ट्रिपल स्टेज आदी आधुनिक यंत्रसामुग्रीची आवश्यकता होती. दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समवेत बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यामध्ये वरील मागण्या मान्य करण्यात आल्या त्यानुसार नवीन रुग्णवाहिका बारामतीत दाखल झाली.
उपमुख्यमंत्री अजितदादा बारामती एमआयडीसी साठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असलेबद्दल उद्योजक त्यांचे विशेष आभार व्यक्त करत असलेचे धनंजय जामदार यांनी यावेळी सांगितले.
आपतकालीन परिस्थितीत उद्योगांना तत्पर सेवा देण्यासाठी अग्निशमन केंद्र कटिबद्ध असून अशा प्रसंगी उद्योजकांनी ०२११२-२४४७२० अथवा ०२११२- २४४७२० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अग्निशमन केंद्रप्रमुख सुनील इंगवले यांनी केले.