बारामतीत टायर चोरीचा एका तासात छडा!

0
11

बारामतीत टायर चोरीचा एका तासात छडा!

₹५१ हजारांचे ८ टायर लंपास; तांत्रिक तपासाच्या आधारे दोन चोरटे जेरबंद

बारामती : फलटण रोडवरील मिश्रीलाल डिस्ट्रीब्युटर्स या टायर दुकानातून तब्बल ₹५१ हजार ४१४ किमतीचे ब्रीजस्टोन कंपनीचे आठ टायर चोरीला गेल्याच्या घटनेचा बारामती शहर पोलिसांनी अवघ्या एका तासात छडा लावला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत जलद कारवाई केली.
दि. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० ते ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या टेरेसवरील उघड्या दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर १९५/६० आर१६ आकाराचे चार आणि १६५/७० आर१४ आकाराचे चार, असे एकूण आठ टायर चोरून नेले. याप्रकरणी दुकानाचे मालक तेजस मनोज मुधा (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच बारामती शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर आणि पोलीस हवालदार सादिक काझी यांनी तांत्रिक माहितीचे बारकाईने विश्लेषण केले. त्यातून अवघ्या एका तासातच चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत रणजित विलास पवार (वय ३२, रा. कुरुबकर नर्सरी शेजारी, बारामती) आणि इरफान मणी तांबोळी (वय २२, रा. फलटण रोड, लहूजी नगर, बारामती) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींना दि. ६ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर रिमांडकामी हजर करण्यात येणार आहे. आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, चोरीच्या या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल कुठे आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here