बारामतीत एमआयडीसीचे नवीन प्रादेशिक कार्यालय स्थापनेस शासनाची मंजुरी….बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या प्रयत्नाला यश ….

0
60

बारामतीत एमआयडीसीचे नवीन प्रादेशिक कार्यालय स्थापनेस शासनाची मंजुरी….
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या प्रयत्नाला यश

बारामतीमध्ये एमआयडीसीचे नवीन प्रादेशिक कार्यालय (Regional Office ) स्थापन करुन या परिसरातील हजारो उद्योजकांना पुण्याऐवजी बारामतीतच स्थानिक पातळीवरच सेवासुविधा द्यावी अशी आग्रही मागणी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे करून पाठपुरावा केला होता. असोसिएशनची मागणी शासनाने मान्य केली असून बारामतीसह राज्यात सात ठिकाणी एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचे आदेश काढले असलेची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.

धनंजय जामदार म्हणाले उद्योजकांना भूखंड मागणी अर्ज करणे, भूखंडाचे वाटप करून घेणे, भूखंडाचा ताबा घेणे, मुदतवाढ घेणे, भूखंड हस्तांतर करणे, विभाजन करणे, एकत्रीकरण करणे, बँक कर्जासाठी त्रिपक्षीय करार करणे, वारस नोंद करणे, नावात बदल करणे, उद्योग स्वरूपात बदल करणे आशा असंख्य कामांसाठी बारामती परिसरातील उद्योजकांना पुणेस्थित एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. परंतु पुणे प्रादेशिक कार्यालयावर बारामतीसह हिंजवडी, चाकण, रांजणगाव, जेजुरी, इंदापूर, कुरकुंभ, पणदरे आदि औद्योगिक क्षेत्राच्या कामांचा प्रचंड बोजा असलेने साहजिकच या कार्यालयाकडून बारामती परिसरातील उद्योजकांच्या कामांना नेहमीच विलंब होत होता. यामुळे बहुमोल वेळ व पैसा वाया जाऊन उद्योजकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता.

बारामती परिसरातील उद्योजकांना कायम भेडसावणाऱ्या या अडचणींचा विचार करून बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह शेख, सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, हरिभाऊ थोपटे, संभाजी माने, चंद्रकांत नलवडे, हरीश कुंभारकर, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे, सूर्यकांत रेड्डी, राजन नायर, अभिजित शिंदे, सौ चारुशीला धुमाळ, सौ उज्ज्वला गोसावी, मॅनेजर माधव खांडेकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांचेकडे बारामतीसाठी एमआयडीसीचे स्वतंत्र नवीन प्रादेशिक कार्यालय मंजुर करण्याची आग्रही मागणी करुन सातत्याने पाठपुरावा केला. असोसिएशनच्या प्रयत्नाला यश मिळाले असून लवकरच एमआयडीसीचे नवीन प्रादेशिक कार्यालय बारामतीत कार्यान्वित होणार आहे. या निर्णयामुळे उद्योजक समाधान व्यक्त करत असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त करत असलेची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here