उजेडाच्या सातबाऱ्यावर
(दंगलकार नितीन चंदनशिवे)
तुझ्या देशात
फक्त गरजतात ढग हल्ली
धग जिवंत असते तुझ्या देशात
पण आगच लागत नाही
नुसत्या मेणबत्त्या पेटतात
मिरवण्यासाठी….
बरसायला सुरवात व्हायला हवी
नाही तर तुझा देश
असाच फडकत राहील
वर्षातून दोनदा
भक्त वाढत जातील फक्त
आटत चाललंय मित्रा
देशप्रेमी रक्त…
पाण्यावर पाय आपटून
गाळ बाहेर येणार नाही
ढवळून काढावा लागेल तलाव
आणि मगरी उलट्या करून
मारायला हव्यात
तुझ्या देशात…
बोटावरच्या शाईची कविता
लिहायचीच नसते कधी
नागडी लोकशाही सुंदर दिसू लागते
आणि कचाकच बलात्कार होतात
कुणालाच सोडत नाहीत लांडगे
तुझ्या देशात
होरपळून मरून चाललात तरी
तुझ्या देशातली जात भाड खाते
धर्म निजतो देवळात
चढत राहतात गिधाडे
उमलून आलेल्या कळ्यांवर
ढगांनो खबरदार या देशात
बरसत आलात तर..?
तुमच्या पाण्याने पिकं
उगवत नाहीत या देशात
तर रोज उगवतो
एक देव
हजारो भक्त
लाखो बलात्कारी
कोटी दरोडेखोर
आणि एक महात्मा सुद्धा
भाकरी उगवणाऱ्याची जमीन फक्त
फासावर लटकत राहते बाभळीला
तुझ्या देशात….
केव्हा ना केव्हा तरी ग्रहण सुटणार आहे.
आणि आमचा सूर्य मोकळा होणार आहे.
कारण उजेडाच्या सातबाऱ्यावर
उजेड पेरणारा भारतीय
अजूनही जिवंत आहे.
दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली
070209 09521 (शेअर करू शकता.)