ज्येष्ठांची अवहेलना : मानवतेची अधोगती…
पेडों जैसी जिंदगी गुजर रही उनकी,
रिश्तेदार फल भी खाते हैं,
और पत्थर भी मारते हैं…
समाजात प्रामुख्याने ज्या बाबींचा अभाव जाणवतो, त्याच बाबी कोणी केल्या की तो चर्चेचा, बातमीचा व दखलपात्र विषय ठरतो. सध्याच्या काळात ‘अमुकचा प्रामाणिकपणा, दागिने, पर्स परत दिले, गरजुंची मदत, मानवतेचे दर्शन घडले’, वगैरे भावनिक बातम्या वृत्तपत्रात आणि सोशल मीडियावर वाचायला मिळतात. याचाच अर्थ आजच्या घडीला हे प्रकार दुर्मिळ झाले आहेत. समाजाचा एक घटक म्हणून आपली सामाजिक जबाबदारी ही पण आहे, हे समजून वागणे बहुमताने बंद झाले आहे. त्याग, सेवा, समर्पण ही सामाजिक शाश्वत मुल्ये अभावाने आढळतात, तर मानवतेची अधोगती होत असून फक्त भौतिक प्रगती होत आहे.
समाजात, कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांची ‘निर्वाह समस्या’ (म्हणजे त्यांचे अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकिय शुश्रुषा (देखभाल) व उपचार) वाढलेली आहे. ज्येष्ठांचे ‘कल्याण’ (म्हणजे त्यांचेसाठी अन्न, आरोग्याची काळजी, मनोरंजन केंद्र, आवश्यक सुविधांसाठी तरतूद) करणे सोडा, उलट त्यांचे हाल होत आहेत. अपवाद असतीलही मात्र बहुतांश ज्येष्ठ (६० वर्षांवरील व्यक्ती) हे पाल्य व नातेवाईक यांच्या क्रुरतेचे बळी ठरत आहे. परिणामी काही ठिकाणी ‘ज्येष्ठांना गोळ्या घाला’, अशा कार्यक्रमाचे आयोजन होत आहेत, ही शोकांतिका आहे.
‘कोन बनेगा करोडपती’ या अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमात एक उप-जिल्हाधिकारी महिला अधिकारी ‘हॉट सिट’ वर होत्या. तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यामध्ये ऑफीसच्या पायर्यावर एक म्हातारी बसून होती. चौकशी अंती ती २-३ दिवसांपासून उपाशी होती, मुलांनी तिला घरातून काढून दिलेले, तेव्हा तिची सोय केली आणि मुलांना पोलिसांमार्फत बोलवून ज्येष्ठांचा निर्वाह व कल्याण कायदा समजावून सांगून असे केल्यास ३ महिन्याची शिक्षा व दंड सांगितला आणि ती समस्या सोडविली.
दुसरी एक घटना रविवार सकाळची. एम.डी. डॉक्टर मित्राचा फोन आला. ‘सर, भौतिक प्रगती म्हणावे की मानसिक अधोगती म्हणावे, समजत नाही’, असे म्हणाले. एका आजोबाला पाच दिवसापूर्वी सिल्व्हरसिटी हॉस्पिटलला भरती करुन मुलगा येतो म्हणून गेला, तर कोणी नातेवाईक व मुलगा परतलाच नाही. त्या वृध्दाची व्यवस्था आजुबाजूच्या रुग्णाचे नातेवाईक पहात आहेत. शेवटी त्याच्या गावाचे पोलिसांना फोन केला, मुलगी व जावई म्हणाले, आजोबाकडे खात्यात ६४ लाख आहेत, आम्ही काही त्यांची प्रॉपर्टी घेतली नाही तर आम्ही काही सेवा करणार नाही’, असे उत्तर मिळाले.
आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, तसेच नियम २०१० नुसार आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांना सर्वसामान्य जीवन जगता यावे, या दृष्टीने त्यांच्या गरजांच्या मर्यादेत, त्यांचा निर्वाह चालविणे हे मुलांचे / नातेवाईकांचे दायित्व आहे. (येथे नातेवाईक म्हणजे सज्ञान असलेला आणि ‘आई-वडील’ अथवा ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता ज्याच्या ताब्यात येईल किंवा कायदेशीर वारसाहक्क मिळेल अशी व्यक्ती) संबंधित हे दायित्व पार पाडत नसल्यास दंड व कारावासाची शिक्षा करता येते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वार्यावर सोडणे व त्यांचा परित्याग करणे या उद्देशाने त्याला कोणत्याही ठिकाणी सोडून देणे, हा पण अपराध आहे. यासाठी ज्येष्ठांना उपविभागीय अधिकारी (महसूल) न्यायाधिकरण यांचेकडे न्याय मागता येईल. थोडक्यात सांभाळ न करणार्या पाल्यांना ३ महिने तुरुंगवास अथवा पाच हजार रुपये दंड अथवा दोनही शिक्षांची तरतूद आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक निर्वाहासाठी अर्ज करण्यास असमर्थ असतील तर त्यांच्यातर्फे प्राधिकृत व्यक्ती किंवा संघटना तक्रार करु शकेल.
या कायद्याअंतर्गत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपला सांभाळ पुढे करेल या अपेक्षेने बक्षिस पत्र अथवा अन्य प्रकारे आपली मालमत्ता हस्तांतरीत केली असेल आणि ‘ती’ व्यक्ती सांभाळ करीत नसेल तर असे झालेले हस्तांतरण लबाडीने किंवा जबरदस्तीने किंवा गैरवाजवी प्रभावाने केले असल्याचे मानण्यात येईल आणि न्यायाधिकरणास असे हस्तांतरण अवैध घोषित करता येईल.
वास्तविक कायदा बनवून सर्वच प्रश्न सुटत नाहीत, मात्र ज्येष्ठांना याचा आधार घेता येऊन पाल्यांना त्यांची जबाबदारी, कर्तव्य याची जाणीव करुन देता येईल. समाजात ही समस्या अधिक गंभीर होवू नये, यासाठी धार्मिक संत, महात्मे, संस्था तसेच सामाजिक संघटना पुढाकार घेतील, अशी अपेक्षा करु या.
शेवटी काळ बदलला हे दाखवितांना एका कवितेच्या दोन ओळी आठवतात…
बहलाकर छोड आते हैं
वृध्दाश्रम में मां बाप को…
क्यूंकी आजकल घर में
पुराना सामान कौन रखता है…
*- - - राजेश राजोरे*
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
खामगाव, जि. बुलडाणा.
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक आहेत.)