पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; धरण क्षेत्रात दमदार बरसात, जलसाठ्यात वाढ..!

0
2

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; धरण क्षेत्रात दमदार बरसात, जलसाठ्यात वाढ..!

पुणे, दि. ५ जुलै : पुणे जिल्ह्यात मान्सूनने चांगलाच जोर धरला असून पश्चिम घाटमाथा, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगाव तालुक्यांत मुसळधार पावसाची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस ताम्हिणी घाट, लोणावळा, मावळ आणि भोर तालुक्याच्या घाट परिसरात झाला आहे. ताम्हिणी परिसरात २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर लोणावळा परिसरातही शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाण्याची आवक होत आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला धरण समूहातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांमध्ये मिळून गेल्या २४ तासांत सुमारे ७०४ दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) पाण्याची आवक झाली आहे. या चारही धरणांमधील एकूण जलसाठा ५.०९ टीएमसीपर्यंत पोहोचला असून तो एकूण क्षमतेच्या सुमारे १७.४७ टक्के आहे.
धरण क्षेत्रातील पावसाची नोंद (२४ तास):
टेमघर – ११५ मिमी
पानशेत – ७२ मिमी
वरसगाव – ६८ मिमी
खडकवासला – २४ मिमी
धरणनिहाय जलसाठा:
पानशेत – २.४५ टीएमसी (२२.९९%)
वरसगाव – २.२६ टीएमसी (१७.६६%)
खडकवासला – ०.३० टीएमसी (१४.९७%)
टेमघर – ०.०९ टीएमसी (२.३१%)
याशिवाय जिल्ह्यातील पवना, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, नीरा देवघर, वीर आणि उजनी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मध्यम ते जोरदार पाऊस सुरू असून जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. पावसाचा हा वेग कायम राहिल्यास आगामी काही दिवसांत धरणांतील पाणीसाठ्यात आणखी मोठी वाढ अपेक्षित आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी पुढील ४८ तास जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संभाव्य पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि वेगवान प्रवाह लक्षात घेता नागरिकांनी नदी, नाले, धबधबे आणि धरणांच्या सांडव्याजवळ जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here